Tata group success story: टाटा उद्योग समूह देशातील सर्वात मोठा उद्योग समूह झाला आहे. टाटा यांनी उभारलेल्या उद्योगाचा विस्तार देशात नव्हे तर विदेशातही झाला आहे. 1870 मध्ये त्यांनी टाटा ग्रुपचे काम सुरु केले होते. त्यांच्याकडे सुरुवातीला एक एम्प्रेस मिल होती, जी 1874 मध्ये सुरू झाली. एम्प्रेस मिलचे पूर्ण नाव विव्हिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड होते. त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारी ती मिल होती. गोपालकृष्णन आणि हरीश भट्ट यांनी लिहिलेल्या ‘जमशेदजी टाटा: पावरफुल लर्निंग्स फॉर कॉरपोरेट सक्सेज’ पुस्तकात कंपनीची यशोगाथा दिली आहे.
जमशेदजी यांनी जेव्हा एम्प्रेस मिल सुरु केली तेव्हा सुरुवातीच्या काळात सर्व निर्णय तेच घेत होते. अगदी कर्मचारी नियुक्तीपासून ते मशीनपर्यंतचे निर्णय त्यांचे होते. त्यांनी ही कंपनी सुरु करण्यासाठी 15 लाख रुपये गुंतवणूक केली होती. ती त्या काळात खूप मोठी रक्कम होती. 1913 पर्यंत या कंपनीचे गुंतवणुकीच्या तुलनेत 30 पट वाढले. जून 1920 मध्ये एम्प्रेस मिलचा नफा 7 कोटी रुपयांपर्यंत पोहचला.
कंपनीने ज्याप्रकारे नफा कमावला, त्याचप्रमाणे त्याचे वाटपही केले. जमशेदजी टाटा यांनी गुंतवणूकदारांमध्ये नफा वाटून घेतला. त्यांनी प्रत्येक वर्षी भागधारकांना 100% लाभांश देण्याचे ठरवले होते. परंतु 1920 मध्ये जेव्हा कमाईचा विक्रम मोडला गेला तेव्हा त्यांनी भागधारकांना 160% लाभांश दिला, हा त्यांचा स्वतःच एक विक्रम होता.
आर. गोपालकृष्णन आणि हरीश भट्ट यांनी पुस्तकात लिहिले आहे की, एम्प्रेस मिल भारतामधील पहिली कंपनी होती ज्याने कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यास सुरुवात केली. 1895 मध्ये कंपनीने अपघाती विमा सुरु केला आणि 1901 मध्ये प्रोव्हिडेंट फंड सुरु केला. त्या काळात भारतात हे सर्व काही नवीन होते. जमशेदजी टाटा यांना या योजनांसाठी कंपनीच्या नफ्यातून पैसे खर्च करावे लागले. परंतु त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. जमशेटजी टाटा अनेकदा म्हणायचे की कर्मचाऱ्यांचे कल्याण ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्या काळात एम्प्रेस मिलमध्ये नोकरी करणे हे लोकांचे स्वप्न होते.