नवी दिल्ली – जपानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. गेल्या चाळीस वर्षातील सर्व रेकॉर्ड महागाईने मोडीत काढले आहेत. महागाई वाढल्याने जपानमधील सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जपानी वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार जपानमध्ये मोठ्या प्रमाणा वस्तू आयात केल्या जातात. मात्र सध्या जपानी चलन असलेल्या येनचे मूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये घसरले आहे. चलनामध्ये झालेल्या घसरणीमुळे आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यामुळे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे जगातील तीसरी सर्वात मोठी अर्थसत्ता असलेला जपान संकटात सापडला आहे.
इकोनॉमिक रिसर्च इंस्टीट्यूटच्या प्रमुख असलेल्या अत्सुशी टाकेडा यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, सध्या वाढती महागाई ही जपानमधील एक प्रमुख समस्या बनली आहे. महागाईने गेल्या चाळीस वर्षातील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने साठेबाजीची शक्यता नाकारता येत नाही. व्यापाऱ्यांनी वस्तूंची साठेबाजी केल्यास, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत महागाई आणखी वाढेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वाढत्या महागाईबाबत सरकार गंभीर असून, ती कमी करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलली जात असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.
अतिरिक्त खर्चाचा बोजा कंपनीवर
गेल्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेमध्ये ऑक्टोबर महिन्यात जपानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये जपानच्या अनेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवलेल्या नाहीत. उत्पादनाच्या किमती स्थिर ठेवल्याचा फटका कंपन्यांना बसत आहे. याबाबत बोलताना एका जपानी कंपनीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही आतापर्यंत किमती वाढवल्या नाहीत. मात्र वाढत्या महागाईमुळे अतिरिक्त खर्चाचा बोजा कंपनीवर पडत आहे. पुढील काळात अशी परिस्थिती कायम राहिल्यास वस्तुंच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते.
संबंधित बातम्या
प्रवासादरम्यान तिकीट हरवले? चिंता करू नका; ‘असे’ मिळवा डुप्लीकेट तिकीट
एसबीआयकडून 2 लाखांचा मोफत फायदा; ‘हे’ ग्राहक असणार लाभार्थी
व्यवसायिकांचे क्रिप्टोकरन्सीला प्राधान्य; सोन्यातील गुंतवणुकीत घट, काय आहेत कारणे?