नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे दिवाळे निघालेल्या हवाई सेवा क्षेत्रासाठी आणि प्रवाशांच्यादृष्टीने एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून विमानांसाठी वापरण्यात येणाऱ्या एव्हिएशन टर्बाईन फ्यूएलच्या (ATF) दरात मोठी वाढ झाली आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी ATF चे दर प्रति किलोलीटर 3972.94 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे आता जेट फ्युएलचा दर प्रति किलोलीटर 72,582.16 रुपये इतका झाला आहे. परिणामी हवाई कंपन्यांकडून आगामी काळात तिकीटांच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जेट फ्युएलच्या दरात बदल होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपया आणि डॉलरच्या विनिमय दरानुसार हे दर निश्चित होतात. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, दिल्लीत ATF ची किंमत वाढून 72,582.16 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये ते 76,590.86 रुपये, मुंबईत 70,880.33 रुपये आणि चेन्नईमध्ये जेट फ्युएलसाठी प्रति किलोलीटर 74,562.59 रुपये मोजावे लागत आहेत.
हवाई इंधनाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे हवाई प्रवास महाग होईल. हवाई तिकिटांबरोबरच मालवाहतुकीचे दरही वाढतील. प्रवाशांवर भाड्याचा बोजा वाढेल आणि त्याचा परिणाम विमानातील प्रवाशांच्या संख्येवर होईल. हवाई सेवा क्षेत्रात, कंपन्यांचा 40 ते 50 टक्के खर्च फक्त एटीएफच्या खरेदीवर होतो. कोरोना महामारीमुळे विमान क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशांतर्गत उड्डाणे सुरू झाली आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम आहे.
पेट्रोल-डिझेल विमानाच्या इंधनापेक्षा महाग आहे. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.95 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 97.84रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.89 आणि 90.17 रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येत्या काही दिवसांत भारतात मोठी इंधन दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीने 2018 नंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 80 डॉलर्स इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करणे अटळ मानले जात आहे.
जगभरात लॉकडाऊनचे निर्बंध हटल्यानंतर अनेक देशांमध्ये दैनंदिन व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे वाहने पुन्हा मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे इंधनाच्या पर्यायाने कच्च्या तेलाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही काळात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी झाल्याने सध्या बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वरच्या दिशेने प्रवास करत आहेत.
गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरीस ब्रेंट क्रूडची किंमत $ 90 ला स्पर्श करू शकते. जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा जोर ओसरल्यानंतर दैनंदिन व्यवहारांना वेग आला आहे. त्यामुळे तेलाची मागणी झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत नुकत्याच आलेल्या चक्रीवादळ इडाच्या विनाशामुळे तेलाच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनानंतर कच्च्या तेलाच्या मागणीत इतक्या झपाट्याने वाढ होईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. आगामी काळात कच्च्या तेलाचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव चढेच राहतील, असा अंदाज आहे.
इतर बातम्या:
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?