मुंबई | 17 डिसेंबर 2023 : JSW समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने त्यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. जिंदल यांच्याविरोधात मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR नुसार, तक्रारकर्तीच्या दाव्यानुसार, कथित बलात्काराची गटना 24 जानेवारी 2022 रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिंदल यांच्या कार्यालयाच्या पेंट हाऊसमध्ये झाली होती. तक्रारकर्त्या महिलेने सर्वात अगोदर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलिसांकडे तक्रार दिली होती. पण तक्रारीवर काहीच कारवाई न झाल्याने तिने न्यायपालिकेचा दरवाजा ठोठावला. आता हायकोर्टाच्या आदेशानंतर जिंदल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे दावा
CNBC-TV18 च्या अहवालानुसार, या महिलेने केलेल्या दाव्यानुसार, सज्जन जिंदल यांच्यासोबत पहिल्यांदा 8 ऑक्टोबर 2021 मध्ये भेट झाली. दोघांमध्ये मालमत्तेसंबंधी काही करार होणार होता. त्यानिमित्ताने दोघांमध्ये संवाद वाढला. मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. जिंदल यांनी तिच्यासोबत शारिरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. पण तिने नकार दिला. दोघांची या काळात अनेक शहरात भेट झाली. त्या दरम्यान त्यांनी शारिरीक संबंधासाठी तिच्यावर दबाव टाकला. 24 जानेवारी 2022 रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिंदल यांच्या कार्यालयाच्या पेंट हाऊसमध्ये जिंदल यांनी तिच्यावर जबरदस्ती केली.
दबाव टाकण्यात आला
16 फेब्रुवारी 2023 मध्ये महिलेने पहिल्यांदा तक्रार दिली. त्यावेळी जिंदल यांच्या काही माणसांनी तिची भेट घेतली आणि हे प्रकरण मिटवण्यास सांगितले. तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. प्रकरणात पोलिसांनी तिची तक्रार घेतली तरी त्याची कॉपी दिली नाही. एक रफ स्टेटमेंट देण्यात आले. गुन्हा नोंदविण्यात आला नाही. पोलिसांच्या असहकार्यामुळे शेवटी तिने 5 डिसेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. प्रकरणात सुनावणीअंती हायकोर्टाने मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 13 डिसेंबर 2023 रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तक्रारीआधारे पोलिसांनी सज्जन जिंदाल यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 354 अंतर्गत गुन्हा नोंदवला.