Salary Overdraft मुंबई : अनेकदा असं होतं की तुम्हाला पैशांची खूप गरज आहे आणि तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे. अशात तुम्ही जर पर्सनल लोनसाठी अर्ज केला तर कमीत कमी 2-3 दिवसांचा वेळ तर लागणारच. अशावेळी तातडीची गरज भागवण्यासाठी इंस्टंट लोनची गरज असते. त्यासाठी नोकरदार असलेल्यांनी बँकेच्या सुविधेची माहिती करुनच घेतली पाहिजे. तुम्ही पगारदार असाल तर बँक आपल्या ग्राहकांना सॅलरी ओव्हरड्रॉफ्टची सुविधा देते. याचा उपयोग करुन तुम्ही काही मिनिटात पैसे मिळवू शकतात. या सुविधेला Salary Overdarft म्हणतात.
सॅलरी ओवरड्रॉफ्ट एकप्रकारचं बँक कर्जच आहे. यात तुम्ही संकटाच्या काळात बँक खात्यात असलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम काढू शकता. ही सुविधा सरकारी आणि खासगी दोन्ही बँकांमध्ये उपलब्ध असते. प्रत्येक बँकेचे सॅलरी ओवरड्रॉफ्टसाठीचे नियम वेगळे असतात. यात तुमचे बँकेशी संबंध, तुमचा पगार किती, सिबिल स्कोअर किती चांगला आहे अशा अनेक घटकांचा परिणाम होतो. याच आधारावर बँक ग्राहकाला सॅलरी ओवरड्रॉफ्ट मिळतो.
हा ओवरड्रॉफ्ट प्री-अप्रूव्ड असतो आणि त्याची बँकेने ठरवलेली एक मर्यादा असते. म्हणजे ग्राहक किती अधिकचे पैसे या सुविधेतून घेऊ शकते याची मर्यादा ठरवण्यात आलेली असते. याचा वापर करुन अडचणीच्या काळात तुम्ही मेडिकल इमरजन्सी, EMI, चेक बाउंस, SIP बाउंस सारख्या घटनांपासून दूर राहू शकता.
ओवरड्रॉफ्टमधून ग्राहकाला किती पैसे मिळू शकतात या प्रश्नाचं उत्तर बँकेनुसार बदलतं. काही बँका पगाराच्या 2-3 पट ओवरड्रॉफ्टची सुविधा देतात. काही बँका केवळ एका महिन्याच्या पगाराच्या 80-90 टक्के रक्कमच देतात. काही बँका ओवरड्रॉफ्टची मर्यादा 4-5 लाख रुपये अशी ठेवतात, तर काही केवळ एक दीड लाख रुपयांची मर्यादा ठेवतात.
ओवरड्रॉफ्ट एक प्रकारचं कर्जच असतं. त्यावर व्याजदर असतो आणि हा व्याजदर पर्सनला लोनपेक्षा अधिकचा असतो. याशिवाय या सुविधेचा वापर करताना प्रोसेसिंग फी देखील घेतली जाते. ही रक्कम एकरकमीच भरण्याची गरज नसते. ग्राहक टप्प्यांमध्ये देखील ही रक्कम फेडू शकतो. जितकं कर्ज शिल्लक राहिल तेवढ्यावरच बँक व्याजदर आकारते.
Know all about how to use Salary Overdraft facility of bank in difficult time