नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळानं (Life Insurance Corporation) बहुचर्चित आयपीओ नंतर विमा रत्न नावानं पॉलिसी जारी केली आहे. एलआयसीची विमा रत्न (Bima ratna) पॉलिसी शेअर बाजारासोबत लिंक्ड नाही. त्यामुळे शेअर बाजारातील तेजी-घसरणीचा पॉलिसीवर कोणताही परिणाम दिसून येणार नाही. एलआयसी विमा रत्न बचतीसोबत सुरक्षेचा लाभ प्रदान करणारं विमा उत्पादन आहे. गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आलेल्या पॉलिसीला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नव्या पॉलिसची एलआयीचे बँक भागीदार, कॉर्पोरेट एजंट तसेच ब्रोकर खरेदी करू शकतील. एलआयसी विमा रत्न ही नॉन लिंक्ड, वैयक्तिक, आजीवन गुंतवणूक विमा योजनेतील (Insurance Saving Plan) प्लॅन आहे. विमा रत्न पॉलिसीमुळे एलआयसी गुंतवणुकदारांना नवा पर्याय समोर आला आहे. मॅच्युरिटी कालावधी पासून मृत्यू लाभापर्यंतचे सर्व पॉलिसीचे लाभ जाणून घेऊया- पॉईंट टू पाँईंट
विमा रत्न पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर एकाधिक फायदे आहेत. पॉलिसीधारकाच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य प्रदान केलं जातं. विमा रत्न मनी बॅक श्रेणीतील पॉलिसी आहे. यामध्ये आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी विमाधारकाला वेळेनुसार पैसे प्राप्त होतात. यासोबतच विमा पॉलीसीत कर्ज सुविधा उपलब्ध असल्यामुळे आकस्मिक खर्चाची पूर्तता करणं शक्य ठरतं.
तुम्हाला पॉलिसी एलआयसीच्या पार्टनर बँक किंवा कॉर्पोरेट एजंट, इन्श्युरन्स, मार्केटिंग फर्म, ब्रोकर यांद्वारे खरेदी करावी लागेल. इन्श्युरन्स मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत व्यक्तींकडून देखील पॉलिसीची खरेदी केली जाऊ शकते.
पॉलिसीधारकाच्या आकस्मिक मृत्यूच्या स्थितीत विमा रक्कम आणि अधिक रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला दिली जाते. विमा रत्न पॉलिसीच्या स्थितीत विमा रक्कम ही मूळ विमा रक्कमेच्या 125 पट मानली जाते. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे वार्षिक पॉलिसी प्रीमियमच्या 7 टक्के रक्कम मृत्यू लाभाच्या स्वरुपात मिळते.
विमा रत्न पॉलिसी जोखीम संरक्षक मानली जाते. उदा, 30 वर्षीय रोहितने 10 लाख रुपये विमा रकमेची विमा रत्न पॉलिसी खरेदी केली. पॉलिसीची कालमर्यादा 15 वर्षे निश्चित केली. रोहितला 11 वर्षे पॉलिसीचे हफ्ते अदा करावे लागतील. वार्षिक प्रीमियम 1,08,450 रुपये असल्यास रोहितला 11,92,950 रुपये भरावे लागतील. रोहितला 13 व्या आणि 14 व्या वर्षी मनी बॅक स्वरुपात 2.5-2.5 लाख म्हणजेच एकूण 5 लाख मिळतील. 15 वर्षांनी पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर रोहितला एकूण 8,25,000 रुपये मिळतील. रोहितला एकूण 13,25,000 रुपये मिळतील.
तुम्हाला आकस्मिक पैशांची आवश्यकता भासल्यास पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात. पॉलिसी सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी कर्ज सुविधा प्राप्त केली जाऊ शकते.
विमा रत्न पॉलिसी तीन टर्ममध्ये उपलब्ध आहे. 15 वर्ष, 20 वर्ष आणि 25 वर्षासाठी पॉलिसी घेतली जाऊ शकते. प्रीमियम अदा करण्याचा कालावधी पॉलिसी कालावधीपेक्षा 4 वर्ष कमी असते, 15 वर्षाच्या पॉलिसीसाठी 11 वर्षे, 20 वर्षाच्या पॉलिसीसाठी 16 वर्षे, 25 वर्षाच्या पॉलिसीसाठी 21 वर्षे हफ्ते भरावे लागतील. विमा रत्न पॉलिसी 90 दिवसांचे बालक ते 55 वर्षाच्या व्यक्तीसाठी उपलब्ध आहे.