मुंबई: ‘उपरवाला जब भी देता है, तो छप्पर फाड के देता है’, हा वाक्यप्रचार आपण आजवर अनेकदा ऐकला असेल. पण केरळमधील एका व्यक्तीला सध्या याचा तंतोतंत प्रत्यय येत आहे. केरळमध्ये राहणाऱ्या बाबू जॉर्ज वालावी यांनी 43 वर्षांपूर्वी मेवाड ऑईल अँण्ड जनरल मिल्स लिमिटेड (Mewar Oil and General Mills Ltd) या कंपनीचे तब्बल 3500 समभाग विकत घेतले होते. मात्र, नंतर बाबू वालावी यांना आपण असे समभाग घेतले आहेत, याचा विसर पडला. मात्र, काही वर्षांनी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी याबाबत चौकशी केली. यावेळी बाबू वालावी यांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण, बाबू वालावी यांच्या खात्यात असणाऱ्या या समभागांची किंमत आज तब्बल 1448 कोटी रुपये इतकी आहे.
मात्र, आता मेवाड ऑईल अँण्ड जनरल मिल्स लिमिटेड कंपनी त्यांना पैसे देण्यास आढेवेढे घेत आहे. त्यामुळे बाबू वालावी यांनी भांडवली बाजार नियामक यंत्रणेकडे (SEBI) धाव घेतली आहे.
बाबू जॉर्ज आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य आता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की तो कंपनीच्या शेअर्सचे खरे मालक तेच आहेत. मात्र, रक्कम खूपच मोठी असल्यामुळे कंपनीकडून त्यांचा हक्क नाकारला जात असल्याचा आरोप आहे.
आयएनएस वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, कोचीमध्ये राहणाऱ्या बाबू जॉर्ज वालावी आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी 1978 साली मेवाड ऑईल अँण्ड जनरल मिल्स लिमिटेड कंपनीचे समभाग खरेदी केले होते. त्यावेळी या कंपनीची भांडवली बाजारात नोंदणी झाली नव्हती. त्यावेळी बाबू वालावी कंपनीचे डिस्ट्रिब्युटर होते. तेव्हा त्यांनी कंपनीचे 3500 समभाग विकत 2.8 टक्के इतकी हिस्सेदारी मिळवली होती. या कंपनीचे संस्थापक पी.पी. सिंघल आणि बाबू वालावी मित्र होते. बाबू जॉर्ज वालावी यांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे सध्या कंपनीचे 3500 समभाग आहेत. अनेक वर्षे कंपनी अनलिस्टेड होती. त्यावर डिव्हिडंट येत नव्हता. त्यामुळे बाबू वालावी यांना आपल्याकडे मेवाड ऑईल अँण्ड जनरल मिल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स असल्याचा विसर पडला होता.
2015 साली बाबू वालावी हे आपली जुनी कागदपत्रे चाळत असताना त्यांना आपण उदयपूरमधील एका कंपनीचे समभाग विकत घेतल्याचे आठवले. त्यांच्याकडे समभाग खरेदी केल्याची सर्व कागदपत्रे होती. कंपनीची अधिक चौकशी केली असता मेवाड ऑईल अँण्ड जनरल मिल्स लिमिटेड कंपनीचे नाव बदलून PI Industries झाल्याचे त्यांना समजले. PI Industries ही कंपनी सध्या कीटकनाशके आणि रसायनांच्या निर्मितीचा व्यवसाय करते. या कंपनीचे भांडवली बाजारातील मूल्य साधारण 50 हजार कोटींच्या आसपास आहे.
बाबू वालावी यांनी PI Industries कंपनीशी संपर्क साधला तेव्हा त्यांनाही धक्का बसला. कंपनीने बाबू वालावी यांच्याकडे तसे कोणतेही समभाग नसल्याचे म्हटले आहे. बाबू वालावी यांनी 1989 सालीच ते समभाग विकले, असे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, बाबू यांनी कंपनीने यासाठी डुप्लिकेट शेअर्सचा वापर केल्याचा आरोप केला आहे.
बाबू वालावी यांच्याकडे 1978 मध्ये कंपनीची 2.8 टक्के हिस्सेदारी होती. त्यानुसार आजघडीला त्यांच्याकडे कंपनीच्या 42.28 लाख समभागांची मालकी आहे. भांडवली बाजारात या समभागांची किंमत 1448 कोटी रुपये इतकी आहे.