नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या (Higher Inflation) तीव्र झळा सर्वसामान्यांना सहन कराव्या लागत आहे. वाढत्या खर्चामुळं आर्थिक बजेट कोलमडलं आहे. दरम्यान, काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्विकारल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीत अग्रेसर असलेल्या Cars 24 नं कंपनीतील सहा टक्के कर्मचाऱ्यांची थेट कपात केल्याचं वृत्त आहे. कंपनीनं कर्मचारी कपातीचं धोरण (Employee cut) स्विकारल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे. सर्वसामान्य प्रक्रिया असल्याची माहिती कंपनीद्वारे जारी करण्यात आली आहे. कोलमडलेलं आर्थिक गणित, आर्थिक समीकरणांची जुळवाजुळव, वाढती महागाईयामुळे कंपन्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी कंपन्यांनी थेट कर्मचारी संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्स, वेदांतू, अनअकॅडमी (Unacademy) यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी बहुसंख्य कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
कार्स24 सर्व्हिसेस लिमिटेडने तब्बल 600 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. कंपनीनं जागतिक विस्ताराचं धोरण स्विकारलं असताना कपातीच्या निर्णयामुळं कामगार वर्तृळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, कंपनीनं कामात कुचराई करणाऱ्या कंपन्यांना कमी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. कपात करण्यात आलेले सर्व कर्मचारी भारतातील आहे.
वेदांतु कंपनीनं दोन वेळा 600 हून अधिक कर्मचाऱ्यांची गच्छंती केली आहे. कंपनीने एकूण कर्मचारी संख्येच्या 10 टक्के कामगारांची कपात केली आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मेलद्वारे कंपनीच्या आर्थिक संकटाचं कारण सांगितलं आहे. एज्यु-टेक क्षेत्रातील अग्रणी अनअकॅडेमीनं 600 आणि नेटफ्लिक्सनं 150 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केलं आहे. यासोबत ई-कॉमर्स व्यवहारातील अग्रणी Meesho, Furlenco यांनी देखील कर्मचारी कपातीचं धोरण हाती घेतलं आहे.
मागणी-पुरवठ्याचं समीकरण जुळविणं कंपन्यांसाठी कठीण ठरत आहे. कच्च्या मालाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सर्व क्षेत्रातील वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. कोविड प्रकोपामुळे मागणीचं समीकरण विस्कळित झालं आहे.
पूर्वपदावर येणाऱ्या कंपन्यांना सावरण्यासाठी आणखी कालावधी लागू शकतो. उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, मागणी अपेक्षेच्या तुलनेनं उंचावलेली नाही. त्यामुळे जमा-खर्चाच गणित जुळविताना कंपन्यांच्या नाकीनऊ आले आहेत.