विमा क्षेत्रातील दादा कंपनी एलआयसीच्या (LIC) शेअर बाजारातील कामगिरीमुळे गुंतवणुकदारांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. मोठा गाजावाज करत मार्केटमध्ये उतरलेल्या एलआयसीमुळे गुंतवणुकदारांना (Investor) पहिल्याच दिवसांपासून देव पाण्यात ठेवावे लागेल. दिवसागणिक या शेअरचा प्रवास उलट दिशेने सुरु आहे. अमेरिकन बाजारातील घसरणीचा दणका आज भारतीय बाजाराला बसला. या तडाख्यात अनेक शेअर धराशायी झाले. त्यात एलआयसीची नौका हेलकावे खात आहे. एलआयसीचा शेअर आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर (Lowest Level) पोहचला. एलआयसीचा शेअरमध्ये आजही घसरण झाली. शेअर 700 रुपयांच्या खाली घसरला. एलआयसीने आज 669.50 रुपयांचा नीचांकी दर गाठला. सकाळी दहा वाजता हा शेअर 2.89 टक्क्यांनी घसरून बीएसईवर ((BSE) 689.20 रुपयांवर ट्रेंड करत होता. 17 मे 2022 रोजी एलआयसीचा शेअर बाजारात सुचीबद्ध झाला होता. तेव्हापासूनच्या घसरणीचा विचार करता आतापर्यंत हा शेअर 21.31 टक्क्यांनी घसरला आहे.
एलआयसीची कामगिरी पाहता, सर्वांनाच घाम फुटला आहे. त्यात अँकर इन्व्हेस्टर्स ही दूर नाहीत. अँकर इन्व्हेस्टर्ससाठीचा लॉक-इन कालावधी आज, 13 जून रोजी संपला. आता या गुंतवणुकदारांना त्यांच्याकडील शेअर विक्री करता येतील. सध्या अँकर इन्व्हेस्टर्सकडे 59 दशलक्ष शेअर्स आहेत. हे अँकर इन्व्हेस्टर्स हे संस्थात्मक गुंतवणुकदार आहेत. यामध्ये 70 टक्के प्रमाण स्थानिक म्युच्युअल फंडाचे आहेत. एलआयसीच्या रडगाण्यामुळे अँकर इन्व्हेस्टर्स आता काय भूमिका घेतात. त्यांनी ही विक्रीचे सत्र सुरु केल्यास एलआयसी शेअर गुंतवणुकदारांची अवस्था ना घरी की ना घाट की होईल.
एलआयसी शेअरहोल्डर्सला आतापर्यंत 1.5 लाख कोटींचा फटका बसला आहे. त्यांचा गुंतवलेला पैसा पाण्यात गेला आहे. त्या पैशाला त्यांना विमा कवच घेता आले नाही. हा शेअर असाच कामगिरी बजावत राहिला तर गुंतवणुकादारांना मोठा फटका बसू शकतो. 17 मे रोजी हा शेअर 872 रुपयांवर विक्री झाला. सरकारने त्याच्या आयपीओची किंमत 949 रुपये ठरवली होती. यापूर्वी या शेअरने 708.70 रुपयांची नीचांकी आणि 920 रुपये उच्चांकी पातळी गाठली आहे.
गेल्या वर्षी ज्या कंपन्यांनी आयपीओ बाजारात दाखल केले, त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. भारतीय शेअर मार्केटबाबत बोलयाचे झाल्यास पेटीएम, झोमॅटो आणि एलआयसीच्या आयपीओने गुंतवणूदारांची निराशा केली आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणा या गुंतवणूकदारांना आतापर्यंत कोटयवधीचा फटका बसला आहे. यापुढेही या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता कमी आहे. या आयपीओमुळे चकाकते ते सर्व सोनं नसतं, असा नवख्या गुंतवणुकादारांना मोठा धडा मिळाला आहे.