नवी दिल्ली : वाढत्या महागाईनं (Inflation) सामान्य माणसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दूध, चहा आणि आता मॅगीच्या किमती वाढल्या आहेत. नेस्ले इंडियानं (Nestle India) मॅगीच्या किमती वाढवल्याची घोषणा केली आहे. मॅगीच्या (Maggi) किमती 9 ते 16 टक्के पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. 12 रुपयांचा मॅगीचा पॅक आता 14 रुपयांना मिळणार आहे. तर, 140 ग्रॅमचा पॅक 3 रुपयांनी वाढला आहे. तर, 96 रुपयांचं पॅकेट आता 105 रुपये झालं आहे. मॅगीच्या किमती का वाढवण्यात आल्या याची माहिती देखील नेस्लेच्यावतीनं देण्यात आली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनं गेल्या महिन्यात चहाच्या किमती वाढवल्या होत्या, कंपनीनं ब्रु कॉफीच्या दरात देखील 3 ते 7 टक्के वाढ केली होती. ताजमाहल चहाच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली होती.
नेस्ले इंडियानं मॅगीच्या किमती का वाढवल्या या संदर्भात माहिती दिली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं मॅगीचा उत्पादन खर्च वाढला आहे. तज्ज्ञांनी रशिया आणि यूक्रेन युद्धामुळं गहू महागला असून त्यामुळं त्याचा देखील परिणाम झाला असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर गेल्या 9 वर्षातील सर्वाधिक पातळीवर आहेत. तर मका देखील गेल्या आठ महिन्यातील सर्वादिक दरानं विकली जात आहे. त्यामुळं दरवाढ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात महागाई वाढली आहे. ठोक महागाई दर वाढून 13.11 टक्के झाला आहे. तर, जानेवारी महिन्यात हादर 12.96 टक्के होता. पुढील महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मॉनेटरी पॉलिसी जारी केली जाणार आहे. महागाईच्या वाढत्या दरामुळं रिझर्व्ह बँकेवर धोरणात बदल करण्यासंदर्भातील दबाव वाढू शकतो.
हिंदुस्थान युनिलिव्हरनं फेब्रुवारी महिन्यात लाईफबॉय, लक्स आणि पिअर्स साबणासोबत सर्प एक्सेल मॅटिक, कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर, डव बॉडी वॉश या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ केली होती. ब्रोकरेज एडलवाईस सिक्यूरिटीजनं हिंदुस्थान युनिलिव्हरकडून करण्यात आलेल्या दरवाढीविषयी भाष्य केलं आहे.
इतर बातम्या: