केला त्याने गाढवपणा, सांगा तुमचे काय जाते
निवडला मार्ग नवा, सांगा तुमचे काय जाते…
गडयांनो, वेडेपणा केल्याशिवाय हाती काही लागत नाही. त्यात जर एखाद्याने वेगळा मार्ग निवडला तर त्याला काय गाढवपणा चाललाय तुझा? असा अनाहूत सल्ला देणारे कमी नाही. गाढव जरी लोकांच्या हेटाळणीचा विषय असला तरी त्याचे दुध आणि प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतो. कर्नाटकातील (Karnataka) एका पठयाने असाच एक हवासा गाढवपणा केला आहे. या गाढवपणात त्याची हुशारी दडली आहे. अहो, लाखो रुपये महिना असलेल्या स्फॉटवेअर कंपनीतल्या जॉबला या पठयाने लाथ मारली नी चक्क एक गाढवांचा फार्म सुरु केला. शेळीपालन, गाय,म्हशींचा तबेला नाही तर चक्क गाढवांचा फार्म(Donkey Farm) . आता ही गोष्ट कोणाला बरं रुचणार, पण या पठयानं त्याची वेगळी वाट चोखंदळली होती. पहिलीच ऑर्डर (First Order) 17 लाखांची मिळवली भावानं. मग काय ज्यांनी टिका केली त्यांना तोंडात बोटं घालायला लागली. मग भावाची सक्सेस स्टोरी व्हायरल झाली. आत तीच तर स्टोरी तुम्ही वाचणार आहात..पण वाचून थांबून नका..असा गाढवपणा एकदा करुन पहाच…
कर्नाटकात सुरु केला पहिला डाँकी फार्म
तर हा गाढवपणा करणा-या या स्टोरीच्या हिरोचं नाव आहे. श्रीनिवास गौडा (Shrinivas Gowda). वय वर्षे 42. म्हणजे आयुष्याच्या दुस-या इनिंगची सुरुवात. लोक या वयात अधिक सोशिक होतात, रिस्क घेत नाही. पण या पठयानं रिस्क घेतली नी कन्नड जिल्हयात सुरु केला स्वतःचा डाँकी फार्म. कर्नाटक राज्यातील हा पहिला तर देशातील दुसरा डाँकी फार्म आहे. केरळमधील एर्नाकुलममध्ये यापूर्वी एक डाँकी फार्म आहे. श्रीनिवास आयटी क्षेत्रात गल्लेलठ पगाराची नोकरी होती. सर्व काही आलबेल होतं. पण वेगळ काही करायचं स्वतःला वचन दिलेल्या श्रीनिवास या नोकरीत रमत नव्हता. त्याने मनाशी हेका केला नी नोकरी सोडून त्यानं गावाकडे हा अभिनवं प्रयोग केला. इरा हे त्याचं गावं. 2020 मध्ये तो गावाकडे परतला आणि गाढवाचं संगोपन केंद्र त्यानं सुरु केलं. 2.3 एकरावर त्याचं हे फार्म आहे. अर्थात शिकल्या सवरलेल्या व्यक्तीनं असं केलेलं धाडस गाढवपणाच ठरतं. झालं ही तसंच. पण श्रीनिवासची जिद्द आणि मेहनतीनं रंग भरले. त्याला पहिली 17 लाखांची ऑर्डर मिळाली.
गाढवाच्या दुधाला सोन्याचा भाव
श्रीनिवासकडे 20 गाढवं आहेत. गाढविणीच्या दुधाला चांगली मागणी असते. आजही गावाकडे गाढवं घेऊन येणा-याकडून लहान मुलांना चमचा भर दुध पाजल्या जाते. श्रीनिवासने नेमकं हेच हेरलं आणि गाढविणीचं दूध एक उत्पादन म्हणून बाजारात दाखल करण्याचा निर्णय घेतला. 30 मिलीलीटर दुधासाठी 150 रुपयांचा भाव आहे. श्रीनिवास या दुधावर प्रक्रिया करुन योग्य पॅकेजिंग केलेलं हे दूध सुपर मार्केट, मॉल्स आणि दुकानांत उपलब्ध करुन देणार आहेत. त्यासाठीचा प्लॅन ही त्यांच्याकडे तयार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, श्रीनिवासला आतापर्यंत 17 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.