मुंबई : पावसाळ्याच्या सिजनमध्ये अनेक लोक घरांचे बांधकाम काढत नाहीत. पावसाळी वातावरण असल्याने साहजिकच बांधकामावर पाणी मारण्याचा अतिरिक्त श्रम व पाणी वाचत असले तरी, पावसामुळे बांधकामात व्यत्यय येत असतो. त्यामुळे साहजिक बांधकाम कमी झाल्यास बांधकाम (Construction) साहित्यांना मागणीही कमी होते. गेल्या काही दिवंसापासून स्टील (Steel) म्हणजे बांधकामासाठी लागणार्या लोखंडी सळयांचे दर गगनाला भिडले होते. परंतु आता दोन महिन्यात स्टीलचे दर तब्बल निम्म्यावर आले असल्याने बांधकाम काढण्यासाठी ही उत्तम संधी मानली जात आहे. या वर्षी मार्चमध्ये स्टीलची किरकोळ किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती, जी आता 45-50 हजार रुपये प्रति टनावर आली आहे. गेल्या काही महिन्यांत केवळ स्थानिकच नाही तर ब्रँडेड स्टीलच्या किमतीतही (price) मोठी घट झाली आहे.
घर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची योग्य वेळ असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सरकारचे प्रयत्न आणि काही हंगामी घटकांमुळे बांधकाम साहित्यांचे दर विक्रमी नीचांकी पातळीवर आले आहेत. आपण सर्वात महागड्या स्टीलच्या दरांबद्दल बोललो तर त्याची किंमत दररोज घसरत आहे. या वर्षी दोन महिन्यांपूर्वी स्टीलचे दर विक्रमी पातळीवर पोहचले होते. तेच दर दोन महिन्यांनंतर निम्मे खाली आले आहेत. याशिवाय सिमेंट ते विटांचे दरही घसरले आहेत.
कुठल्याही बांधकामासाठी सर्वाधिम महत्वाचा घटक हा स्टील असतो. घर किंवा इमारतीच्या मजबूतीसाठी तुम्ही कुठल्या प्रकार तसेच किती जाडीची स्टील वापरत आहात यावर तुमच्या बांधकामाची विश्वासार्हता ठरत असते. त्यामुळे बांधकामात स्टीलला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. घरांचा स्लॅब, पिलर आदी बनवण्यासाठी स्टीलचा मोठ्या संख्येने वापर केला जात असतो. पाया बांधतानाही स्टील मजबुती देत असते. त्यामुळे साहजिकच मागणी व पुरवठ्याच्या खेळामध्ये काही दिवसांपूर्वी स्टीलचे दर वाढल्याने बांधकाम करणारेही जेरीस आले होते. मार्चमध्ये काही ठिकाणी स्टीलची किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती. सध्या हा आकडा 45 हजार रुपये प्रति टनापर्यंत खाली आला आहे.
सरकारने अलीकडेच स्टीलवरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात स्टील उत्पादनांच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. हे देखील स्टीलच्या किमती कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. मार्च 2022 मध्ये, ब्रँडेड स्टीलचे दर प्रति टन 1 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचले होते.