नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी अमेरिकन गुंतवणुकदारांना भारतामधील अक्षय्य उर्जा आणि वीजनिर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. आर.के. सिंह यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संभाव्य गुंतवणुकदारांशी संवाद साधला. आगामी काळात ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी स्वस्त दरात वीजेचा अविरत पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आगामी काळात अक्षय्य उर्जा आणि वीजनिर्मिती क्षेत्राला महत्त्व प्राप्त होणार असल्याचा दावा आर.के. सिंह यांनी केला.
या बैठकीत 50 अमेरिकन गुंतवणुकदार सहभागी झाले होते. 2030 पर्यंत भारताने 450 गीगावॅट टन रिन्युएबल एनर्जीचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इलेक्ट्रिसिटी ग्रीडच्या ओपन एक्सेसमुळे अक्षय्य उर्जेचा खप वाढेल. त्यामुळे अमेरिकन उद्योजकांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन आर.के. सिंह यांनी केले.
तसेच भारतात सोलर सेल मॉड्युल आणि बॅटरी निर्मितीला अधिकाअधिक प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय, ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीलाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे आर.के. सिंह यांनी सांगितले.
एनटीपीसी रिन्यूबल एनर्जी लिमिटेडकडून गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात 4,750 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क उभारले जाणार आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हे देशातील सर्वात मोठे सोलर पार्क ठरणार आहे.
भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ असणाऱ्या कच्छच्या वाळवंटात उभारल्या जाणाऱ्या या सोलर पार्कमध्ये अनेक कंपन्यांना यापूर्वीच सौर आणि पवन उर्जेच्या प्रकल्पांसाठी जमिनी ताब्यात देण्यात आल्या आहेत. एनटीपीसीचा प्रकल्प खवडा आणि विघकोट या गावांच्या परिसरात असेल.
सध्या गुजरातला 18000 मेगावॅट वीज लागते. राज्यात सध्याच्या घडीला 30,500 मेगावॅट वीजेची निर्मिती करणारे प्रकल्प आहेत. यापैकी 11,264 मेगावॅट क्षमतेचे वीजप्रकल्प हे रिन्यूबल एनर्जी प्रकारात मोडणारे आहेत. गेल्या 12 वर्षात ही क्षमता दहापटीने वाढली आहे.
कच्छच्या वाळवंटातील नव्या सोलार पार्कमुळे स्थानिक लोकांना मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या सोलर पार्कसाठी अनेक तंत्रज्ञांची गरज लागणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात.
संबंधित बातम्या:
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना
नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये
आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च