मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपले सर्वात जुने कर्मचारी मनोज मोदी यांना 1500 कोटी रुपयांचे घर गिफ्ट दिलं आहे. मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे राईट हँड आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक डीलमध्ये मनोज यांचा सहभाग असतो. विशेष म्हणजे मनोज आणि मुकेश अंबानी एकत्रच शिकलेले आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांनी आपल्या या मित्राला आलिशान घर देऊन आश्चर्याचा धक्का दिला आहे. मनोज मोदी यांना देण्यात आलेलं हे घर खरोखरच आलिशान आहे. ते पाहताच क्षणी दिसून येतं.
अंबानी कुटुंबाने मनोज मोदी यांच्यासाठी मुंबईतील पॉश वस्तीमध्ये 22 मजली इमारत खरेदी केली आहे. नेपियन्सी रोडवर ही आलिशान इमारत आहे. त्याला वृंदावन असं नाव देण्यात आलं आहे. ही 22 मजली इमारत 1.7 लाख वर्ग फूट क्षेत्रात पसरलेली आहे. मॅजिकब्रिक्स डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, या इमारतीची किंमत 1500 कोटी रुपये आहे. या घराची डिझाईन तलाटी अँड पार्टनर्स एलएलपीने केली आहे. घरातील काही फर्निचर इटलीहून मागवण्यात आले आहेत.
22 मजली या इमारतीचे पहिले सात मजले पार्किंगसाठी ठेवण्यात आले आहेत. मनोज मोदी यांच्या इमारतीचा प्रत्येक मजला 8 हजार वर्ग फूट एवढा आहे. नेपिन्सी रोड हा दक्षिण मुंबईतील मलबार हिल जवळचा अप मार्केट परिसर आहे. या परिसरात तिन्ही बाजूने अथांग समुद्र आहे. या ठिकाणी जगभरातील सुविधा आहेत. म्हणजेच मनोज मोदी यांच्या घराच्या तिन्ही बाजूला अथांग समुद्र आहे.
मनोज मोदी आणि मुकेश अंबानी दोघेही क्लासमेट आहेत. दोघेही मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजीनियरिंगमध्ये शिकलेले आहेत. मनोज मोदी हे 1980च्या सुरुवातीला रिलायन्समध्ये आले होते. त्यावेळी धीरूभाई अंबानी हे रिलायन्सचा कारभा पाहत होते. मनोज मोदी हे रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे डायरेक्टरही आहेत. मात्र, तरीही ते प्रसिद्धीपासून सतत दूर आहेत. मनोज मोदी दशकांपासून मुकेश आणि नीता अंबानी यांचे मित्र आहेत. सध्या मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांची मुलं आकाश, ईशा आणि अनंत यांच्यासोबत काम करत आहेत.