नवी दिल्ली : जगातील अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकाचा वरचष्मा आहे. जगातील टॉप-10 अब्जाधीशांपैकी 8 तर महासत्तेचे नागरिक आहेत. हे सर्वच श्रीमंत अर्थातच 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये पोहचले आहेत. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) या यादीत पहिल्या क्रमांकावर अजूनही फ्रान्सचे गर्भश्रीमंत बर्नार्ड अर्नाल्ट हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 204 अब्ज डॉलर आहे. तर 10 व्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हे आहेत. त्यांच्याकडे 94 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीतून बाहेर फेकले गेले तर गौतम अदानी (Gautam Adani) असे नंबर वन ठरले आहेत.
श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी मागे टाकले. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्समध्ये अंबानी 12 व्या क्रमांकावरुन 13 व्या स्थानी पोहचले आहेत. अंबानी यांच्याकडे 85.8 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर झुकरबर्ग यांच्याकडे 87.4 अब्ज डॉलरची नेटवर्थ आहे.
कमाईत झुकरबर्ग अग्रेसर
यंदा अमेरिकन अब्जाधीशांवर लक्ष्मीची मोठी कृपा आहे. मार्क झुकरबर्ग यंदा कमाईत अग्रेसर आहेत. त्यांनी कमाईत नंबर वन बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकले. त्यांनी एकूण 41.8 अब्ज डॉलरची संपत्ती जमवली. बर्नार्ड अर्नाल्ट यांना यावर्षी केवळ 41.6 अब्ज डॉलरची कमाई करता आली. एलॉन मस्क यांना यंदा 29.3 अब्ज डॉलर कमाविता आले. जेफ बेजोस यांना 28 अब्ज डॉलर, बिल गेट्स 16.1 अब्ज डॉलर, वॉरेन बफे 6.53 अब्ज डॉलर, लॅरी एलिशन यांना 17.3 अब्ज डॉलर, स्टीव्ह बाल्मर 22.1 अब्ज डॉलर, लॅरी पेज 23.2 अब्ज डॉलर, सर्गी ब्रिन 21.4 अब्ज डॉलर अशी कमाई केली आहे.
अदानी असे ठरले नंबर वन
गेल्या वर्षी कमाई करण्यात उद्योगपती गौतम अदानी यांचा कोणीच हात धरत नव्हते. झटपट श्रीमंतीत त्यांनी हनुमान उडी घेतली होती. पण यंदाचे वर्ष त्यांना मोठे धक्कादायक ठरले. संपत्ती गमाविण्यात त्यांचा या यादीत पहिला क्रमांक आहे. तर दुसऱ्या स्थानी चीनचे अब्जाधीश झांग यिमिन हे आहेत. अदानी यांच्या एकूण संपत्तीला सुरुंग लागून 65.5 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. झांग यांनी केवळ 12.6 अब्ज डॉलर संपत्ती गमावली आहे.
नफ्यात जोरदार वाढ
देशातील दिग्गज कंपनी रिलायन्सने आर्थिक वर्ष 2022-23 मधील मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात जोरदार कामगिरी बजावली आहे. त्यांचा निव्वळ नफा 19 टक्क्यांनी वाढला आहे. आता हा नफा 19,299 कोटींच्या घरात पोहचला आहे. कंपनीला आतापर्यंत एखाद्या तिमाहीत मिळालेला हा सर्वाधिक नफा आहे. रिलायन्स समूहाने जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीतील आर्थिक आकेडवारी जाहीर केली. यासंबंधीची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली. कंपनीला पेट्रो रसायन आणि तेलाच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळाले. तर किरकोळ बाजार आणि दूरसंचार उद्योगाने त्यांना मोठी साथ दिली.