देशात सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासमोर असणाऱ्या अडचणी कमी होत नाही. अनिल अंबानी यांच्याकडे असणाऱ्या कंपन्यांवर संकटांचे ढग कायम आहे. आता कर्जात बुडालेल्या तीन कंपन्या अनिल अंबानी यांच्या हातातून जाणार आहे. रिलायन्स कॅपिटलमधील असलेल्या तीन विमा कंपन्या हिंदुजा ग्रुप खरेदी करणार आहे. हिंदूजा ग्रुपची कंपनी असलेली इंडसइन्ड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) या कंपन्या घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंश्योरेन्स रेगुलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (IRDAI) लवकरच या प्रस्तावाला हिरवा झेंडा मिळणार आहे. मागील आठवड्यात कमिटी ऑफ क्रेडिटर्सने IIHL ला 27 मे पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले आहे, असे वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सने दिले आहे.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLT) रिलायन्स कॅपिटलला IIHL साठी ₹9,650 कोटींच्या योजनेस 27 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली होती. NCLT ने IIHL ला 90 दिवसांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. IRDAI ने मार्चमध्ये लिहिलेल्या पत्रात या डीलबद्दल काही आक्षेप नोंदवले होते. नियामकाने विशेषतः IIHL च्या शेअरहोल्डिंग स्ट्रक्चरवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच IRDAI ने IIHL च्या भागधारकांची तपशीलवार माहिती मागवली होती. एका सूत्राने सांगितले की, IIHL ने IRDAI च्या सर्व प्रश्नांचे निराकरण केले आहे आणि नियामक लवकरच त्यास मान्यता देईल अशी अपेक्षा आहे.
29 नोव्हेंबर 2021 रोजी, RBI ने पेमेंट डिफॉल्ट आणि गव्हर्नन्स लॅप्समुळे रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड विसर्जित केले होते. सप्टेंबर 2021 मध्ये, रिलायन्स कॅपिटलने भागधारकांना सांगितले की कंपनीवर 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. रिलायन्स कॅपिटलचा कारभार IIHL कडे 17 मे पर्यंत ट्रॉन्सफर केला नाही पुन्हा परवानगीची प्रक्रिया करावी लागणार आहे.
डीलनुसार, रिलायन्स कॅपिटलची रिलायन्स जनरल आणि रियायन्स हेल्थ इन्शूरन्समध्ये शंभर टक्के भागेदारी आहे. रिलायन्स निप्पॉन लाईफमध्ये 51% भागेदारी आहे. हिंदुजा ग्रुपने जे स्ट्रक्चर जाहीर केले आहे, त्यानुसार 30% एक्विजिशन कॉस्ट अशिया एंटरप्राइजेज इक्विटी गुंतवणुकीत घेणार आहे. तर 70% डेटच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. आयआयएचएलने एक ड्राफ्ट स्ट्रक्चर तयार केली आहे. त्यानुसार रिलायन्स कॅपिटलची संपूर्ण इक्विटी खरेदी केली जाणार आहे.