मुंबई | 4 जानेवारी 2024 : जगभरातील नामांकित कंपन्याच्या शीर्षस्थानी भारतीय वंशाच्या व्यक्तींचा दबदबा वाढतच चालला आहे. गुगलपासून मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाचे लोक करीत आहेत. या यादीत आता नवीन नाव जोडले गेले आहे. भारतीय मूळ असलेले टेक सीईओ निकेश अरोरा यांच्या नावे नवा किर्तीमान स्थापन झाला आहे. एकेकाळी गुगलमध्ये सर्वाधिक वेतन मिळविणारे निकेश अरोरा आता जगातील नवे आणि साल 2024 चे पहिले अब्जाधीश बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या मते निकेश अरोरा यांना साल 2024 चे पहिले अब्जाधीश बनण्याचा मान मिळाला आहे. या वर्षाचे पहिले अब्जाधीश होण्याबरोबरच ते निवडक टॉप नॉन-फाऊंडर टेक अब्जाधीश बनले आहेत.
सायबर सिक्युरिटी कंपनी पाओ अल्टो नेटवर्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकेश अरोरा यांचे नेटवर्थ 1.5 अब्ज डॉलरवर पोहचले आहे. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे 1,24,97,19,00,000 इतकी आहे. साल 2018 मध्ये पाओ अल्टो नेटवर्क्सची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकेश यांच्याकडे कंपनीचे शेअर आहेत. पाओ अल्टो नेटवर्क्सच्या शेअरचे भाव वधारल्यानंतर निकेश अरोराच्या हिश्श्यातील शेअरचे भाव वाढवून 830 दशलक्ष डॉलरवर पोहचली आहे.
निकेश साल 2012 मध्ये गुगलचे सर्वाधिक वेतन घेणारे कर्मचारी बनले त्यावेळी ते प्रथमच चर्चेत आले. त्यावेळी गुगलने त्यांना 51 दशलक्ष डॉलरचे पॅकेज दिले. गुगल शिवाय त्यांना सॉफ्टबॅंकमध्येही रेकॉर्ड बनविला. साल 2014 त्यांना सॉफ्टबॅंकने त्यांना 135 दशलक्ष डॉलरचे पॅकेज दिले होते. त्यांना मिळालेल्या पॅकेजमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता ते यंदाच्या वर्षाचे पहिले अब्जाधीश बनले आहेत.
निकेश उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. 9 फेब्रुवारी 1968 रोजी जन्मलेल्या निकेश यांचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण एअरफोर्सच्या शाळेत झाले. नंतर त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून आयआयटी केले. इलेक्ट्रीक इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केल्यानंतर त्यांनी पहिली नोकरी विप्रोमध्ये केली. नंतर नोकरी सोडून ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. वडीलांना त्यांना 75,000 रुपये दिले होते. बोस्टनच्या नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटीतून एमबीए करताना अभ्यासासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी बर्गर शॉपमध्ये नोकरी करीत अभ्यास केला. दिवसाचा जॉब आणि रात्रीचा अभ्यास करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
निकेश यांनी अभ्यास करीत असताना रहाण्याचा आणि अभ्यासाचा खर्च भागविण्यासाठी नोकरी सुरुच ठेवली. अशाच प्रकारे चार्टर्ड फायनान्शियल एनालिस्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना बर्गर शॉपमध्ये सेल्ममन आणि सिक्युरिटी गार्डची नोकरी करीत अभ्यासाचा खर्च भागवला आणि आज निकेश या पदावर पोहचले.