केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी देशाचा अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) सादर केला. अर्थसंकल्पातून प्रत्येक नोकरदाराला कर रचनेतून सरकार काहीतरी फायदा करुन देईल याची खात्री होती, पण प्राप्तिकर रचनेत (Income Tax Slab) कोणताही बदल झालेला नाही. तरीही तुम्ही तुमच्या पगारावर कर वाचवू शकता, मात्र यासाठी तुम्हाला आतापासूनच नियोजन करावं लागेल.कर वाचवायचा असेल तर त्याचे नियोजन वर्ष सुरू होताच सुरू व्हायला हवे. कर बचत वेळेवर करुन फायदा नसतो. वर्षाच्या सुरुवातीलाच याचे नियोजन करणे गरजेचे असते. वर्षभर या गोष्टीकडे लक्ष ठेवले तर तुम्हाला कर बचतीचा फायदा होतो. कर वाचविण्यासाठी योग्य नियोजन करून सर्व वजावटी (Tax Deductions), प्रतिपूर्तीचा लाभ (Reimbursement to save tax) घेतला तर १२ लाख रुपयांपर्यंतच्या वेतनावर बचतीमधून कमाई होऊ शकते.
बरेच लोक वेळेच्या शेवटी कर वाचवण्याचा विचार करतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. एकतर सुरुवातीला पगारपत्रक समजून घ्यायला हवे. तुम्हाला कंपनीकडून मिळणा-या सवलती आणि सोयी-सुविधा तसेच भेट याची नोंद ठेवायला हवी. कंपन्या उत्कृष्ट कर्मचा-यांसाठी काही आकर्षक योजना, कुपन्स, सहल आणि अशा बरेच काही योजना राबविते. त्याचा योग्य फायदा घेतल्यास एकप्रकार कर बचत होते.
पगारपत्रक समजून घेताना
प्रत्येकाच्या पगारात मूळ वेतन आणि महागाई भत्ता म्हणजेच डीए असतो, ज्यावर तुम्हाला कोणतीही सूट मिळत नाही. यावर तुम्हाला पूर्ण कर भरावा लागतो. याशिवाय पगारात सर्व प्रकारचे विशेष भत्ते आणि रिइन्शुरन्सचा समावेश असतो. ज्यामध्ये एचआरए, एलटीए, कन्व्हेयन्स अलाऊन्स, फूड कूपन, इंटरनेट बिल, फोन बिल, ट्रायव्हल अलाऊन्स अथवा इंधन भत्ता अशा गोष्टींचा समावेश असतो. त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास तुम्हाला कर बचतीसारखाच फायदा होतो.
घरभाडे
लोक इतर शहरांमध्ये नोकरीसाठी जातात आणि तिथे भाड्याने राहतात. अशा परिस्थितीत सरकारकडून कंपनीकडून मिळणाऱ्या एचआरए अर्थात घरभाडे भत्त्यावर करसवलत मिळते. मात्र एचआरएवर किती सूट मिळेल, याबाबत काही नियम आहेत. एका मर्यादेत तुम्हाला या कर सवलतीचा फायदा उचलता येतो. कपंनी पगारात एचआरएचा समावेश करते. मेट्रो सिटीत मुळ वेतनाच्या 50 टक्के आणि नॉन मेट्रोसिटीत अर्थात निम्न शहरात मुळ वेतनाच्या 40 टक्के एचआरए मिळतो. त्यावर कर सवलत मिळवता येते.
फिरण्यातून कर बचत
ब-याच कंपन्या कर्मचा-यांसाठी प्रवास भत्ता देतात. वर्षांतून दोनदा वा चारदा त्याचा फायदा घेता येतो. तुमचा जाण्या-येण्याचा खर्च कर सवलतीसाठी पात्र असतो. तुम्ही कुटुंबासह गेल्यास होणा-या खर्चातून प्रवासाचा खर्च कंपनी तुम्हाला देते.त्यामुळे तुमची फिरण्यातून कर बचत होते. हा खर्च कर सवलतीसाठी जोडता येतो. त्यामुळे जर तुमची कंपनी एलटीए देत नसेल तर एचआरशी बोला आणि एलटीएचा फायदा घ्या. जर तुम्ही 30 टक्के कर रचनेत येत असाल तर या फिरण्यातून तुम्हाला खूप मोठी बचत करता येईल. तसेच कुटुंबालाही तुम्हाला वेळ देता येईल.
मुलांचे शिक्षण भत्ता आणि वसतिगृह भत्ता
या भत्त्यांमध्ये भलेही मोठा फायदा होत नसेल, मोठी कर सवलत मिळत नसेल. परंतु अनेक वेळा केवळ 1 रुपयांमुळे आपला पगार करपात्र उत्पन्नाच्या कक्षेत येतो. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतीही करसवलत सोडू नये. मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह भत्ता ही प्रकारे वेळेवर धावून येणारी मित्रच आहेत. मात्र, याचा लाभ केवळ ज्यांची मुले शाळेत शिकत आहेत, त्यांनाच मिळतो. हॉस्टेलमध्ये शिकत असेल तर हॉस्टेलचा भत्ताही मिळतो. या दोन्हीअंतर्गत तुम्हाला एकूण 9,600 रुपयांपर्यंत करसवलत मिळते.
प्रतिपुर्तीचा दावा
बरेच लोक प्रतिपूर्तीला (Reimbursement) एक झंझट समजतात आणि त्याला डोके लावायला नको असा त्यांचा ग्रह असतो. तसेच हा प्रकार अनेकांना कमी पणाचा ही वाटतो. मात्र तुमचं फोन बिल, इंटरनेट बिल, इंधन भत्ता आणि इतर अनुषांगिक भत्ते, व्यवसायासाठी करावा लागलेल्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च याची योग्य बिलं सादर करुन प्रतिपुर्तीचा दावा केल्यास तुमचे दरमहिन्याचा वाटणारा छोटा खर्च वर्षाकाठी मोठा खर्च वाचवू शकतो. सर्व मिळून तुम्ही वर्षाकाठी 50 ते 70 हजार रुपयांपर्यंत बचत करु शकता. फक्त त्यासाठी सजग रहावे लागते.
असा मिळवा वजावटीचा फायदा
योग्य नियोजन केल्यास नोकरदार वर्गाला वजावटीद्वारे (Tax Deductions) लाभ उठविता येतो.
1- प्रत्येक नोकरदाराला 50 हजारांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते.
2- कलम 80 सीतंर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कराचा लाभ मिळतो. याअंतर्गत तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आदींमध्ये गुंतवणूक करू शकता. याअंतर्गत तुम्हाला मुलाच्या ट्युशन फीमध्ये सवलतही मिळते
3- त्यानंतर 80 सीसीडी अंतर्गत एनपीएसमधील गुंतवणुकीवर वजावट मिळते. यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 50 हजार रुपयांची अतिरिक्त वजावट मिळू शकते.
4- 80डी अंतर्गत आरोग्य विम्यावर करसवलत मिळेल. आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर स्वत:साठी 25 हजार रुपयांपर्यंत आणि पालकांसाठी 50 हजार रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते.
5- 5000 रुपयांवर कर सवलतीत तुम्हाला प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करता येईल
6- गृहकर्ज आणि इलेक्ट्रिक व्हेईकल लोनवर तुम्हाला वेगवेगळ्या अटींनुसार दीड-दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर करसवलत मिळू शकते. ही सूट 80 ईई अंतर्गत उपलब्ध आहे.
7- एवढेच नव्हे तर बचत खाते आणि एफडीवर 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावरही करसवलत मिळू शकते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत 50 हजार रुपये आहे
संबंधित बातम्या :
Digital Rupee | कशी कराल डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण ? मोबाईलमधूनच चालणार बँक
BUDGET 2022: चुकीला माफी, पण दंड भरुन..! आयटीआर नियमात बदल, ‘ही’ अट महत्वाची