गेल्या वर्षभरात देशात दान देणाऱ्या लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक मोठ्या उद्योगपतींचा समावेश आहे. देशाच्या एकूण 1,539 श्रीमंत व्यक्तींचा या यादीत समावेश आहे. आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान कोणी कोणी किती दान केले याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. या यादीत अंबानी किंवा अदानी अव्वल स्थानावर नाहीयेत. तर मग कोण आहे देशातील सर्वात दानशूर व्यक्ती जाणून घ्या.
या यादीत पहिलं नाव हे शिव नाडर यांचे आहे. ते एचसीएल टेक्नोलॉजीजचे संस्थापक आहेत. मागील वर्षी शिव नाडर यांनी 2,153 कोटींचे दान केले होते. तर 2022-23 च्या तुलनेत यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाडर हे या यादीत सलग तीन वर्षापासून अव्वल स्थानावर आहेत.
देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती हे मुकेश अंबानी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 407 कोटी रुपये दान केले होते. ताज्या यादीत त्यांना दुसरे स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी अंबानींच्या क्रमवारीत एका अंकाने सुधारणा झाली आहे.
ऑटो आणि आर्थिक क्षेत्रात व्यवहार करणाऱ्या बजाज कुटुंबाने गेल्या वर्षी 352 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी बजाज कुटुंबाने 2022-23 च्या तुलनेत 33 टक्के जास्त रक्कम दान केली आहे.
कुमारमंगलम बिर्ला आणि कुटुंब यांनी देखील या वर्षात 334 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ते या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी कुमारमंगलम बिर्ला आणि त्यांच्या कुटुंबाने 17 टक्के अधिक रक्कम दान म्हणून दिली होती.
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले गौतम अदानी यांनी गेल्या वर्षी दान म्हणून 330 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या यादीत ते पाचव्या स्थानावर कायम आहेत.
महिलांमध्ये 154 कोटी रुपये दान करणाऱ्या रोहिणी नीलेकणी हा पहिल्या स्थानावर आहे. रोहिणी या लेखिका आणि इन्फोसिसचे संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या पत्नी आहेत.
900 कोटी रुपयांसह रिलायन्स इंडस्ट्रीज धर्मादाय कारणांसाठी पैसे दान करण्याच्या बाबतीत अव्वल कंपनी ठरली आहे. कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज (CSR) वर 840 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात शिक्षण क्षेत्राला त्यांनी सर्वाधिक 3,680 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. हेल्थकेअरसाठी 626 कोटींसह दुसऱ्या स्थानावर आणि रुरल ट्रान्सफॉर्मेशसाठी 331 कोटींसह तिसऱ्या स्थानावर आहे.