नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकारने आपला पेटारा उघडला आहे. मोदी सरकारने आज अंतरिम बजेट सादर करताना घोषणांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने या घोषणा केल्या आहेत. येत्या काळात आणखी दोन कोटी घरे बांधणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज देण्याची महत्त्वाची घोषणाही सीतारामन यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वेगळ्या दिशेने जात आहे. पारदर्शी सरकार हेच आमचं ध्येय आहे. भाषणाच्या सुरुवातीची 20 मिनिटे सीतारामन यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला. ही कामे कुठपर्यंत आली त्याची माहितीही दिली. त्यानंतर सीतारामन यांनी घोषणांचा पाऊस पाडला. पंतप्रधान आवास योजननेअंतर्गत येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.
आमचं सरकार सर्व्हायकल कॅन्सर रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर असणार आहे. पिकांसाठी नॅनो डॅपचा वापर केला जाणार आहे. डेअरींचाही विकास केला जाणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. 1361 मंडयांना ईनेमने जोडलं जाणार आहे. याशिवाय मिशन इंद्रधनुषमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. 9 ते 14 वर्षाच्या मुलींना मोफत लस देण्यात येणार आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे, अशी घोषणाही सीतारामन यांनी केली.
पब्लिक ट्रान्स्पोर्टसाठी ई-वाहन उपलब्ध केली जाणार आहे. रेल्वे- समुद्र मार्गाला जोडण्यावर आमचा भर राहणार आहे. पर्यटन केंद्राचा वेगाने विकास केला जाणार आहे. पर्यटन सेक्टरचा विकास व्हावा हा आमचा हेतू आहे. राज्यांना व्याजमुक्त कर्ज दिलं जात आहे. टीयर २ आणि टीयर ३ शहरांना हवाईमार्गाने जोडलं जाणार आहे. लक्षद्वीपमध्ये नव्या विकास योजना सुरू करण्यात येणार आहेत. पीएम आवास योजनेत 70 टक्के घरे महिलांसाठी तयार करण्यात आली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2014 पासून ते 2023 पर्यंत एफडीआयमध्ये वाढ झाली आहे. त्यातील सुधारणेसाठी 75 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं सांगतानाच जुलैमध्ये पूर्ण बजेट सादर केला जाईल. त्यावेळी विकासाचा विस्तृत रोडमॅप सादर केला जाणार आहे. आम्ही पायाभूत सुविधांवर 11 टक्क्याहून अधिक खर्च करणार आहोत. तसेच लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.