नवी दिल्ली | 18 February 2024 : पु्ण्यातील रोल्टा इंडिया (Rolta India) ताब्यात घेण्यासाठी बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कंबर कसली आहे. बोली लावण्याचा योग आल्याने पतंजलीने लागलीच हा योग साधला. राष्ट्रीय कपंनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT)कर्जात बुडालेल्या रोल्टा इंडियाची पुन्हा बोली लावण्यासाठी नुकतीच मंजुरी दिली. यापूर्वी या कंपनीच्या पुण्यातील एशडन प्रॉपर्टीजसठी 760 कोटी रुपयांची बोली लागली होती. आता पतंजलीने व्यवहारासाठी 830 कोटी रुपयांची बोली लावली आहे. प्रकरणात सुनावणी झाली असता, या व्यवहारासाठी इच्छुक अर्जदारांना अजून एक संधी देण्यास हरकत नसल्याचे मत NCLT, मुंबई खंडपीठाने व्यक्त केले होते.
Rolta India करते काय
1989 मध्ये कलम के सिंह यांनी रोल्टा इंडिया कंपनीची स्थापना केली होती. संरक्षण क्षेत्रासाठी GIS आणि भौगोलिक सेवेद्वारे काम करते. ही कंपनी सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्ससोबत काम करत आहे. 2015 मध्ये संरक्षण मंत्रालयाने 50 हजार कोटी रुपयांहून अधिक वॉर एरिया मॅनेजमेंट सिस्टिमसाठी या कंपनीला विकास संस्था म्हणून काम दिले होते.
इतक्या कोटींचे आहे कर्ज
काही योजना बंद पडल्याने रोल्टा इंडिया कर्जबाजारी झाली. रोल्टा इंडिया सप्टेंबर 2018 मध्ये कंपनी दिवाळखोरीसाठी न्यायालयात पोहचली. तर युनियन बँक ऑफ इंडिया राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात पोहचली. रोल्टा इंडियावर जवळपास 14,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यात 7,100 कोटी रुपये युनियन बँक तर 6,699 कोटी रुपये सिटी ग्रुपच्या परदेशी बाँडधारकांचे आहेत.
बाबा रामदेव का उतरले स्पर्धेत
पतंजलीने स्वदेशी कंपनी म्हणून अनेक क्षेत्रात मांड ठोकली आहे. परदेशी कंपन्यांच्या भारतातील मोठ्या मार्केटमध्ये पतंजलीने जोरदार मुसंडी मारली आहे. कंपनी आता विविध क्षेत्रात विस्तारत आहे. सॉफ्टवेअर विभागापेक्षा रोल्टा इंडियाच्या महाराष्ट्रासह देशातील मोक्याच्या जागा पतंजलीला खुणावत आहेत.