देशातील सर्वात मोठे डिजीटल प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएमच्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसत आहे. Paytm चे मालक असलेल्या One 97 Communications या कंपनीच्या ऑपरेटिंग महसूलमध्ये गेल्या तीन महिन्यात चांगली सुधारणा झाली आहे. सध्या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यातील ऑपरेटिंग महसूलमध्ये 1500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेटीएम कंपनीसह ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेटीएममधील सेवांमध्ये सुधारणा केली होती. त्यासोबतच पेटीएमने आणि UPI पेमेंट व्यतिरिक्त, QR कोड पेमेंट सेवा, साउंड बॉक्स आणि इतर आर्थिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले आहे. आता कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याचा परिणाम कंपनीच्या कामकाजावर दिसून येत आहे. त्यातच आता कंपनीने गेल्या तीन महिन्यात त्यांना झालेल्या नफाबद्दलची घोषणा केली आहे. पेटीएमने शेअर बाजारातील गुंतवणूकीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात 1502 कोटींचा महसूल जमा केला आहे.
यानुसार पेटीएम या कंपनीचे कर भरण्यापूर्वीचे (EBITDA) उत्पन्न आणि महसूल याची तुलना केली असता, त्याचा निव्वळ तोटा 792 कोटी रुपये आहे. सध्या कंपनीची चांगली कमाई होत असल्याने येत्या काळात कंपनीच्या नफ्यात सुधारणा होऊ शकते, असे म्हटलं जात आहे.
सध्या कंपनीच्या वित्तीय सेवांमधून 280 कोटी रुपये उत्पन्न होते. तर कंपनीने मार्केटिंग सेवांमधून 321 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. यात कंपनीचा नफा 50 टक्के असून आतापर्यंत 755 कोटी रुपये नफा झाला आहे. यामुळे कंपनीच्या बॅलेन्स शीटमध्येही सुधारणा झाली आहे. सध्या कंपनीकडे 8,108 कोटी रुपये जमा आहेत.
“काही महिन्यांपूर्वी अस्थिर झालेला आमचा ग्राहक आता स्थित झाला आहे. त्यासोबतच आता मर्चंट ऑपरेटिंग मेट्रिक्समध्ये सुधारणा होत आहे. येत्या काळात अधिक चांगल्या रिटर्नसाठी हा योग्य पर्याय आहे”, असे मत पेटीएम प्रवक्त्यांनी दिली आहे.
पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, आमचा व्यापारी पेमेंट ऑपरेटिंग व्यवसाय जानेवारी 2024 प्रमाणे सुरु आहे. त्यामुळे कंपनीने पुन्हा एकदा दुकानदारांना क्यूआर कोड आणि साउंडबॉक्स बसवून देण्याची सेवा सुरु केली आहे. तसेच कंपनीच्या मर्चंट ग्राहक संख्येत सुधारणा झाली आहे. आता ही संख्या 1.9 कोटींवर पोहोचली आहे. तसेच पेटीएमचे एकूण व्यवसायिक मूल्य देखील जानेवारी 2024 इतके झाले आहे. गेल्या तीन महिन्यात हे 4.3 लाख कोटी रुपये झाले आहे. याशिवाय कंपनीने कॉस्ट ऑप्टिमायझेशनवरही खूप लक्ष दिले आहे.