नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात येत आहेत. 19 मे रोजी आरबीआयने दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या नोटा बदलण्यासाठी आरबीआयने दोनदा मुदतवाढ दिली. शेवटची मुदतवाढ 30 सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांनी आपल्याकडील नोटा बदलण्यास सुरुवात केली. मात्र, दिल्लीसहीत आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयाबाहेर अचानक गर्दी झाली. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण रांगेत होते. नोटा बदलण्यासाठी ही रांग लागली होती.
आरबीआयने याच वर्षी 19 मे रोजी एक मोठी घोषणा केली होती. 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेणार असल्याचं आरबीआयने म्हटलं होतं. नागरिकांना आपल्याकडील नोटा बदलता याव्यात म्हणून आरबीआयने त्यांना 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर ही वेळ वाढवून 7 ऑक्टोबर करण्यात आली होती. नंतर 8 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेच्या 19 प्रादेशिक कार्यालयात या नोटा बदलता येऊ शकतात असं आरबीआयने म्हटलं होतं.
त्यानंतर आरबीआयने बँकांच्या शाखांमध्ये नोटा बदलणे आणि जमा करण्याची सुविधा बंद केली होती. दरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी दिल्लीसहीत आरबीआयच्या अनेक कार्यालयात लोक रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं. अचानक ही गर्दी वाढली होती.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी मोठी माहिती दिली. आतापर्यंत दोन हजार रुपयांच्या किती नोटा परत आल्या हे त्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत 3.43 लाख कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. अजूनही 12 हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याचं शक्तिकांत दास यांनी सांगितलं होतं.
व्यक्ती किंवा संस्था आरबीआयच्या 19 प्रादेशिक कार्यालयात एकाचवेळी 20 हजार रुपयापर्यंतच्या दोन हजाराच्या नोटा बदलू शकतात. मात्र, बँक खात्यात दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याच्या रकमेची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. नोव्हेंबर 2016मध्ये 500 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटांचं विमुद्रीकरण केलं होतं. आरबीआयने 500 रुपयांच्या नव्या नोटांसह दोन हजार रुपयांच्या नोटाही बाजारात आणल्या होत्या.