पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत

| Updated on: Jun 21, 2021 | 10:12 AM

Flex fuel engines | वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

पेट्रोल-डिझेल नव्हे तर या इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींकडून महत्वपूर्ण संकेत
फ्लेक्स-फ्यूएल इंजिन
Follow us on

नवी दिल्ली: सध्या देशभरात इंधनाचे भाव वाढल्याने मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वपूर्ण संकेत दिले आहेत. केंद्र सरकार देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. (Flex fuel engines to get mandatory for carmakers in India says Nitin Gadkari)

वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलही त्याच मार्गावर आहे. याउलट इथेनॉलचा प्रतिलीटर दर 60 ते 62 रुपये इतका आहे. त्यामुळे वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असल्यास इंधनाच्या खर्चात मोठ्याप्रमाणात बचत होईल, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे.

फ्लेक्स-फ्यूएल इंजिनमुळे काय होणार?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे. त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर देशभरात वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य होईल.

कोणत्या देशात वापरले जाते फ्लेक्स-फ्यूएल इंजिन?

सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा समावेश

केंद्र सरकारने येत्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेडिंगचे लक्ष्य ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमीप्रमाणात करावी लागेल. 2015 मध्ये पेट्रोलमध्ये एक ते दीड टक्के इथेनॉलची मात्रा होती. सध्या हे प्रमाण 8.5 टक्के इतके आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Petrol and diesel price: देशभरात इंधन दरवाढीची ‘साथ’; मुंबईनंतर आणखी एक मेट्रो सिटीत पेट्रोल शंभरीपार

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

(Flex fuel engines to get mandatory for carmakers in India says Nitin Gadkari)