नवी दिल्ली: देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच संसदीय समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना इंधनाच्या वाढत्या दरांविषयी विचारणा करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलचे दर कशाप्रकारे नियंत्रणात आणता येतील, त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, अशी विचारणा खासदारांनी केली. (Petrol and Diesel rates in country)
यावर पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी हात झटकण्याचे काम केले. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीवर ठरतात. त्यामुळे यामध्ये आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही, असा एकंदरित सूर पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लावला.
या बैठकीला पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांच्यासह आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल आणि गेल या पेट्रोलियम कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संसदीय समितीमधील सदस्यांनी या अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची उत्तर पाहता तुर्तास तरी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर भरभर वाढायला सुरुवात झाली होती. तेव्हापासून इंधनाच्या दरात साधारण 24 वेळा दरवाढ झाली असून, त्यामुळे देशातील इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. 29 मे रोजी मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता.
संबंधित बातम्या:
Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड
आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
(Petrol and Diesel rates in country)