या आठवड्यात नवीन नवीन IPO ची एन्ट्री होत आहे. सोमवारी बजाज हाऊसिंग फायनान्सची लिस्टिंग झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ आला आहे. मंगळवारी तो लिस्ट झालाय. लिस्ट झाल्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळाला आहे. जो बीएसईवर 73.75 टक्के प्रीमियमसह 834 रुपये आणि NSE वर 72.91 टक्के प्रीमियमसह 830 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्याची IPO किंमत 480 रुपये होती. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांनी लिस्टिंगवरच 350 रुपये नफा कमावला आहे. मात्र, लिस्टिंग झाल्यानंतर त्यात घसरण देखील दिसून आली.
या IPO ला एकूण 59 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनी IPO द्वारे मिळालेल्या पैशांचा वापर महाराष्ट्रात 12 नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी करणार आहे. याशिवाय यातून कर्जाची परतफेड देखील केली जाणार आहे. तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी देखील तो वापरला जाणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल वार्षिक 76 टक्क्यांनी वाढून 4507 कोटी रुपये झाला होता. कंपनीचा करानंतरचा नफा 35 टक्क्यांनी वाढून 94 कोटी रुपये झाला आहे.
ग्रे मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद
या IPO ला ग्रे मार्केट मध्ये उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ज्या दिवशी IPO उघडला त्या दिवशी त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) 240 रुपये होता. अशा स्थितीत, सुमारे 50 टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध होणे अपेक्षित होते. यानंतर त्याचा जीएमपी वाढला आणि तो 303 रुपये झाला. म्हणजेच, ग्रे मार्केटनुसार, सुमारे 63 टक्के प्रीमियमसह तो 783 रुपयांमध्ये सूचीबद्ध होईल असे संकेत होते.
पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनी विविध प्रकारच्या दागिन्यांचे व्यवहार करते. यामध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंड याचा समावेश आहे. थोडक्यात ते PNG ब्रँड म्हणून ओळखला जातो. कंपनीचे देशभरात 30 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कंपनीची महाराष्ट्रात सर्वाधिक स्टोअर्स आहेत. अमेरिकेतही त्यांचे दुकान आहे.