भारतीय उद्योग क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताना अनेकांना शोक अनावर झाला. बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी तरुण वयातच जबाबदारी घेत टाटा समुहाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण रतन टाटा यांनी लग्न का केले नाही? याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे असेल.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी लग्न केले नाही, एका मुलाखतीदरम्यान रतन टाटा यांनी त्यांच्या लव्ह लाईफबद्दल सविस्तरपणे सांगितले होते. आयुष्यात एकदा नव्हे तर चारवेळा प्रेमाने दार ठोठावले होते, पण कठीण प्रसंगामुळे त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही, असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही आणि संपूर्णपणे टाटा समूहाचा व्यवसाय भारतात विस्तारण्यावर लक्ष केंद्रित केले.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सुरतमध्ये झाला होता. रतन टाटा यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि एक चांगले स्थानही मिळवले. टाटा समूहाला नव्या उंचीवर ते घेऊन गेले. यामुळेच आज टाटा जगात प्रसिद्ध आहेत. पण व्यावसायिक क्षेत्रातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक असलेले रतन टाटा प्रेमाच्या बाबतीत अयशस्वी ठरले.
रतन टाटा यांनी मुलाखतीत सांगितले होते की, ते प्रेमात पडले होते, पण लग्न न करण्याचा निर्णय त्याच्यासाठी योग्य ठरला, कारण त्याने लग्न केले असते तर परिस्थिती खूपच गुंतागुंतीची झाली असती,. ते मुलाखतीत म्हणाले होते की, ‘तुम्ही विचाराल की मला कधी क्रश होता का, तर मी तुम्हाला सांगतो की मी चार वेळा लग्न करण्याबाबत गंभीर झालो आणि प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या भीतीने मी मागे हटलो. आपल्या प्रेमाच्या दिवसांबद्दल बोलताना टाटा म्हणाले, “मी जेव्हा अमेरिकेत काम करत होतो, तेव्हा मी कदाचित प्रेमाबाबत सर्वात गंभीर झालो होतो आणि मी भारतात परत आल्यामुळेच आम्ही लग्न करू शकलो नाही.”
रतन टाटा यांचे जीच्यावर प्रेम होते तिला भारतात यायचे नव्हते. त्याच वेळी भारत-चीन युद्धही सुरू होते. शेवटी त्याच्या मैत्रिणीने अमेरिकेतच दुसऱ्याशी लग्न केले. यानंतर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष टाटा समूहावर केंद्रित केले आणि समूह कंपन्यांना पुढे नेण्याचे काम केले. घरच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिठापासून ते आकाशातील हवाई प्रवासापर्यंत सर्व गोष्टींमध्ये टाटा समूहाचे अस्तित्व आहे.
रतन टाटा खूप आनंदी जीवन जगले, त्यांना अनेक गोष्टींची आवड होती. कारपासून पियानो वाजवण्यापर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश आहे. यासोबतच फ्लाइंगही त्याच्या आवडत्या यादीत टॉपवर होते. टाटा सन्समधून निवृत्ती घेतल्यानंतर रतन टाटा म्हणाले होते की, आता मला आयुष्यभर माझे छंद जोपासायचे आहेत. आता मी पियानो वाजवणार आणि विमान उडवण्याचा माझा छंद पूर्ण करणार.