टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे केवळ एक उद्योजक नव्हते तर अत्यंत साधे आणि दर्यादिल व्यक्ती होते. देशातील असंख्य लोकांसाठी ते एक प्रेरणास्त्रोत होते. 1991 ते 2012 या काळात त्यांनी टाटा ग्रुपचे चेअरमन म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेत बिझनेस सेक्टरमध्ये मोठे यश संपादन केले. देशातील सर्वात जुन्या उद्योजक घराण्याचं रतन टाटा यांनी नुसतं उज्ज्वल केलं नाही तर टाटा हे नाव जागतिक ब्रँड बनवलं.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937मध्ये नवल आणि सूनू टाटा यांच्या घरी झाला. त्यांनी 1962मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून वास्तुकलामध्ये पदवी घेतली. त्यानंतर 1975मध्ये हावर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. त्यांचे वडील नवल टाटा हे एक यशस्वी उद्योजक होते. त्यांनी टाटा समूहात महत्त्वाची जबाबदारी निभावली होती. तर रतन टाटा यांची आई सोनी टाटा या गृहिणी होत्या.
रतन टाटा हे 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये असिस्टंट म्हणून रूजू झाले. त्याच वर्षी टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी ( आताची टाटा मोटर्स) मध्ये जमशेदपूर संयंत्रमध्ये सहा महिन्यांची ट्रेनिंग घेतली. विविध कंपन्यांमध्ये सेवा दिल्यानंतर त्यांनी 1971मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. 1981 मध्ये त्यांना समूहातील कंपनी टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. या ठिकाणच्या समूह रणनीतीक थिंक टँक आणि उच्च प्रौद्योगिकी व्यवसायात नव्या उपक्रमातील प्रवर्तक बदलण्यास ते जबाबदार होते.
1991 ते 28 डिसेंबर 2012 पर्यंत आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत टाटा समूहची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे ते अध्यक्ष होते. या काळात त्यांनी टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल बेवरेजज, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस सहीत अनेक कंपन्यांचे अध्यक्ष होते. भारतासह जगभरातील उद्योग जगताशी त्यांचा संबंध होता. रतन टाटा हे मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसचे ते आंतरराष्ट्रीय सल्लागार बोर्डात होते. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अॅलाइड ट्रस्टसचेही ते अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या प्रबंधन परिषदेचेही ते अध्यक्ष होते. दक्षिणी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या विश्वस्तपदीही ते कार्यरत होते.
1. टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून 1991-2012 पर्यंत सेवा.
2. जॅग्वार लँड रोवरची खरेदी (2008).
3. कोरसची खरेदी (2007).
4. टाटा स्टीलला जागतिक पातळीवर नेले
5. टाटा मोटर्सचे यश
6. टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेज (टीसीएस)ला जागतिक पातळीवर पोहोचवणे
7. टाटा समूहच्या जागतिक ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ
1. पद्म विभूषण (2008)
2. पद्म भूषण (2000)
3. ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (2009)
4. इंटरनेशनल हेरिटेज फाउंडेशनचे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड (2012)