भारताच्या उद्योग क्षेत्राला उंचीवर नेऊन ठेवणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. काल बुधवारी त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे अत्यंत दिलदार बिझनेसमॅन म्हणून प्रसिद्ध होते. देश संकटात असताना धावून जाणारे उद्योजक म्हणूनही प्रसिद्ध होते. रतन टाटा हे अत्यंत स्वावलंबी स्वभावाचे होते. त्यांनी त्यांची कार चालवण्यासाठी कधीच ड्रायव्हर ठेवला नाही. ते स्वत: कार चालवायचे. स्वत: विमानही चालवायचे. हेलिकॉप्टरही उडवायचे. एका मुलाखतीत त्यांनी या गोष्टींचा खुलासा केला होता. आता त्यांची ही मुलाखत व्हायरल होत आहे.
रतन टाटा यांनी या मुलाखतीत त्यांच्या कार प्रेमावर भरभरून भाष्य केलं होतं. मला कार खूप आवडतात. मी 60च्या दशकातील आणि आताच्या कार कलेक्ट करत आहे. या कारची स्टायलिंग आणि मॅकेनिक्सबाबत मला प्रचंड रुची आहे. त्यासाठी मी त्या खरेदी करतो आणि त्यांची माहिती मिळवतो. मी आजही प्लेन उडवतो, हेलिकॉप्टरही उडवतो. त्याचा वापर मी पुण्याला जाण्यासाठी करतो. एव्हिएशन टेक्नॉलॉजीत मला प्रचंड रुची आहे, असं रतन टाटा म्हणाले होते.
नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांचा एक किस्सा सांगितला होता. एकदा रतन टाटा गडकरी यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी ते रस्ता विसरले. टाटांनी गडकरींना फोन विचारून पत्ता विचारला. त्यावर गडकरी म्हणाले की, तुम्ही तुमच्या ड्रायव्हरला फोन द्या. मी त्यांना पत्ता सांगतो. तेव्हा, कार मीच चालवतोय असं टाटा म्हणाले. टाटांचं हे उत्तर ऐकून गडकरींना आश्चर्य वाटलं होतं. एवढ्या मोठ्या माणसाकडे ड्रायव्हर नाही, सेक्युरिटीसाठी कोणीच नाही, याचं आश्चर्य आणि अप्रुपही त्यांना वाटलं. पण टाटा हे स्वत: हेलिकॉप्टरही उडवतात हे ऐकून अजून एक आश्चर्याचा धक्का बसला होता. गडकरी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
टाटा यांना फुटबॉल, टेनिस आणि गोल्फ पाहणं आवडायचं. पण फक्त टीव्हीवर. या खेळांमध्ये कोणता खेळाडू खेळतोय हे मला माहीत नसतं. पण मी त्या खेळाडूंच्या क्षमतेकडे पाहत असतो. त्याचा आनंद घेतो, असं टाटांनी म्हटलं होतं.
रतन टाटा यांचे चारवेळा लग्न होता होता राहिलं. एकदा तर त्यांचं लग्न होता होता राहिलं. त्यावेळी रतन टाटा अमेरिकेत होते. त्यांच्या आजीने त्यांना फोन करून बोलावलं होतं. त्यावेळी भारत आणि चीनचं युद्ध सुरू होतं. त्यामुळे रतन टाटा यूएसमध्ये अडकले होते. त्यामुळे त्या मुलीचे घरचे थांबले नाहीत. त्यांनी दुसरीकडे मुलीचं लग्न लावून दिलं. मात्र, काही काळानंतर या मुलीच्या पतीचं निधन झालं. काही वर्षापूर्वी टाटा एकदा बॉम्बे हाऊसच्या ऑफिसमध्ये बसले होते. तेव्हा एका व्यक्तीने टाटांना चिठ्ठी दिली. पॅरिसमधून एका मुलीने ही चिठ्ठी पाठवली होती. ही चिठ्ठी त्याच मुलीची होती, जिच्याशी त्यांचं लग्न होऊ शकलं नव्हतं. त्या मुलीचं कुटुंब आहे. तिला एक मुलगाही आहे. त्यानंतर रतन टाटा आणि या महिलेमध्ये चांगली मैत्री झाली होती. टाटांनीच ही माहिती शेअर केली होती.
टाटा यांच्याकडे दोन जर्मन शेफर्ड डॉग होते. कुलाबा येथे यूएस क्लबमध्ये 20 हून अधिक डॉग्सला टाटा स्वत: अन्न भरवायचे. मात्र, एके दिवशी त्यांना एक बातमी मिळाली आणि त्यांनी या श्वानांना भरवणं बंद केलं. कुणी तरी या श्वानांना विष देऊन मारल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर त्यांनी या क्लबमध्ये पायच ठेवला नाही.
रतन टाटा यांना व्यंगचित्रकार म्हणून आर के लक्ष्मण प्रचंड आवडायचे. अकबर पद्मसीही त्यांची पसंती होती. या दोन्ही महान कलाकारांच्या पेटिंग्सही त्यांच्याकडे होत्या. पण पेटिंग्स खरेदी करणं महागडं झाल्याने त्या खरेदी करत नसल्याचंही त्यांनी एकदा म्हटलं होतं.
रतन टाटा यांना 60 आणि 70च्या दशकातील संगीत त्यांना अधिक आवडतं. बीटल्स त्यांना आवडतं. शास्त्रीय संगीताचे ते भोक्ते होते. त्यांना शॉपेन, सिम्फनी आवडते. तसेच बिथोवन आणि चेकोस्कीही आवडतात. पण त्यांची एक इच्छा अपूर्णच राहिली. त्यांना पियानो वाजवायला शिकायचं होतं. पण कामाच्या व्यस्ततेमुळे राहून गेले.
रतन टाटा हे सिनेमे पाहायचे. पण थिएटरमध्ये कधी जात नव्हते. त्यांना घरीच टीव्हीवर सिनेमे पाहायला आवडायचे. पण कोणते सिनेमे पाहिले त्याची नावे मात्र त्यांना आठवत नसायची. वाचकांसाठी त्यांनी एक पुस्तक सुचवलं होतं. ‘द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन’ हे पुस्तक वाचण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. मी पाचवेळा हे पुस्तक वाचलं. माझे डोळे पाणावले असं ते म्हणायचे.