नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : भारताचा शेअर बाजाराने आज इतिहास रचला. शेअर बाजार 71 हजार अंकांच्या पुढे गेला. अमेरिकन केंद्रीय बँक फेड रिझर्व्हच्या निर्णयामुळे परदेशातील बाजारा तेजीसह बंद झाले. त्यामुळे आयटी क्षेत्राला मोठा फायदा झाला. आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र दिसले. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सलटंन्सीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला. त्यामुळे टीसीएसचे मार्केट कॅप 66 हजार कोटी रुपयांनी वधारले. कंपनीचे एकूण भांडवल 14 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. शेअर बाजारात टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी टीसीएसच्या आकड्यांनी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला.
कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ
सध्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. आकड्यानुसार, सध्याच्या काळात टीसीएसचा शेअर 4.29 टक्क्यांनी म्हणजे 157.15 रुपयांनी वधारला. हा शेअर आता 3823.75 रुपयांवर व्यापार करत आहे. तर आज कंपनीचा शेअर या उसळीसह या 52 आठवड्यातील उच्चांकावर 3846.60 रुपयांवर पोहचला. आज कंपनीचा शेअर 3660.20 रुपयांवर उघडला आणि एक दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 3666.60 रुपयांवर बंद झाला होता.
टीसीएसला 66 हजार कोटींचा फायदा
टीसीएस कंपनीचे मार्केट कॅपमध्ये आजच्या व्यापारी सत्रात मोठी वाढ झाली. आकड्यानुसार, कंपनीचे मार्केट कॅप 14 लाख कोटींच्या पुढे पोहचले. एक दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 13,41,943.55 कोटी रुपये होते. तर कंपनीचा शेअर आज 3846.60 रुपयांवर पोहचला आणि कंपनीचे मार्केट कॅप 14,07,821.98 कोटी रुपयांवर पोहचले. कंपनीच्या एकूण मार्केट कॅपमध्ये या व्यापारी सत्रात जवळपास 66 हजार कोटी रुपयांची वाढ दिसून आली.
डिसेंबर महिन्यात 10 टक्क्यांची झाली वाढ
संपूर्ण डिसेंबर महिन्याचा विचार करता कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के म्हणजे प्रति शेअर 353 रुपयांची वाढ दिसून आली. 30 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर 3500 रुपयांच्या खाली होता. तो आज 3850 रुपयांच्या जवळपास पोहचला. त्यावेळी कंपनीचे मार्केट कॅप 12,78,553.86 कोटी रुपये होते. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1,29,268.12 कोटी रुपयांची वाढ झाली. यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओने बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या आयपीओने बाजारात एकच उसळी घेतली. त्यानंतर शेअरने पण मोठी मुसंडी मारली.