महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBIनं घातली बंदी, ग्राहकांना खात्यातून फक्त 10,000 काढता येणार

| Updated on: Nov 24, 2021 | 11:19 PM

मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी RBI ने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे त्यांना 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बचत आणि चालू खाते अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय

महाराष्ट्रातील या बँकेवर RBIनं घातली बंदी, ग्राहकांना खात्यातून फक्त 10,000 काढता येणार
Reserve Bank Of India
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी महाराष्ट्रातील मलकापूर नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांवर विविध निर्बंध लादलेत. या सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलेय. रिझर्व्ह बँकेने एक निवेदन प्रसिद्धीस दिलेय. मलकापूर नागरी सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही, कोणतेही दायित्व घेणार नाही आणि आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पेमेंट करणार नाही, असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय.

10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही

मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी RBI ने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक म्हणजे त्यांना 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बचत आणि चालू खाते अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. विशेष म्हणजे सर्व बचत बँक किंवा चालू खात्यांमधून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही, असे आरबीआयने म्हटलेय.

निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू राहतील

नवे निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू राहतील. सहकारी बँकांना सूचना जारी करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये, असंही आरबीआयने स्पष्ट केले. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील, असे निर्देशांमध्ये म्हटलेय. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करू शकते, असे निवेदनात म्हटलेय.

यापूर्वीच दंड आकारण्यात आला

याआधीही आरबीआयने अनेक सहकारी बँकांना दंड ठोठावला असून, अनेकांवर बंदी घातली. यामध्ये मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक आणि गडहिंग्लज नागरी सहकारी बँक, अशा नागरी सहकारी बँकांची नावे आहेत. RBI ने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर नो युवर कस्टमर (KYC) वर दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 2.00 लाखांचा आर्थिक दंड ठोठावला.

निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला दंड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरही आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड करण्यात आला. या कारवाईअंतर्गत दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. आरबीआयच्या कारवाईतील तिसरी सहकारी बँक गडहिंग्लज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आहे, जी महाराष्ट्रातील गडहिंग्लज येथे आहे. त्यावर RBI ने 10 लाखांचा दंड ठोठावला होता. या तिन्ही नागरी सहकारी बँका आहेत.

संबंधित बातम्या

RBI ने TCPSL ला 2 कोटी आणि ATPL ला 54.93 लाखांचा दंड ठोठावला, काय आहे प्रकरण?

भारत सरकारकडून My Home Group चा सन्मान; चांगल्या कार्यासाठी गौरव