मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराची नोट बंद केली आहे. येत्या सप्टेंबरनंतर ही नोट चलनात नसेल. ही नोट बदलून घेण्यासाठी आरबीआयने नागरिकांना चार महिन्याचा म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वोच्च किंमतीची नोट पूर्णपणे बंद होणार आहे. मात्र, ही नोट अत्यंत कमी वेळात बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही नोट बंद करण्याचं कारण काय? इतक्या अल्प काळासाठी ही नोट बाजारात का आणली? ही नोट चलनात आणण्या मागचं कारण काय आहे? दोन हजाराची नोट ज्या कारणासाठी चलनात आणण्यात आली तो उद्देश पूर्ण झाला काय? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 2016मध्ये चलनात आणलेली दोन हजाराची नोट चलनातून का मागे घेतली जात आहे याची माहिती दिली. आरबीआयने दोन हजाराच्या नोटेला क्लिन नोट पॉलिसी अंतर्गत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत आरबीआय हळूहळू दोन हजाराची नोट चलनातून काढून घेणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार केवळ 3.62 लाख कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा व्यवहारात आहेत. मात्र, त्याचं वितरण फारच कमी होत आहे.
क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआय अशा प्रकारचे निर्णय नेहमी घेत असते. ज्या लोकांकडे दोन हजाराची नोट आहे. त्यांनी 23 मे 2023 पासून देशातील कोणत्याही बँकेत जाऊन बदलवून घ्याव्यात. नोट बदलण्यासाठी बँकेत गर्दी करू नये. चार महिन्याचा अवकाश आहे. चार महिन्यात कधीही नोटा बदलू शकता. दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयने लिमिट तयार केलं आहे. त्यानुसार एकावेळी केवळ 20 हजार रुपयांपर्यंतचीच रक्कम बदलता येऊ शकते. म्हणजे एकावेळी 20 हजार रुपये बदलून मिळेल.
2016मध्ये 500 आणि 1000 ची नोट चलनातून बाद करण्यात आली होती. त्यामुळे पैशांचा तुटवडा निर्माण झाला असता. म्हणून पैशाचे मूल्य कायम ठेवण्यासाठी 2 हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली. कारण त्यावेळी मोठ्या प्रमाणावर सिस्टिममधून पैसे काढले जात होते, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. 1 हजार आणि 500 च्या नोटा बंद केल्यानंतर रातोरात 10 लाख कोटी रुपये गायब झाले होते. त्यामुळे दोन हजाराची नोट बाजारात आणल्याचं त्यांनी सांगितलं.
म्हणजे 500 आणि 1000ची नोट बंद केल्यानंतर जो तुटवडा निर्माण होणार होता, तो भरून काढण्यासाठी 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या. आता मार्केटमध्ये इतर मूल्यांच्या नोटांची कमतरता नाहीये. त्यामुळे दोन हजाराच्या नोटा चलनातून काढून घेतल्या जात आहेत. या नोटा बाजारात आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. तसेच इतर नोटाही बाजारात पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे 2018-2019मध्ये दोन हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.
2016मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी या नोटा व्यवहारात मोठ्या प्रमाणावर होत्या. 2016च्या नोटाबंदीच्या काळात 500 आणि 1000 रुपयांच्या 86 टक्के नोटा चलनात होत्या. मात्र, सरकारने रातोरात या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी दोन हजाराच्या नोटा तात्काळ बाद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.