मुंबई : एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आधीच कंबरडं मोडलंय. त्यात आता बँकांनी ग्राहकांचाही खिसा कापण्याचा निर्णय घेतलाय. एटीएममधून पैसे काढण्यासह वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत. यातून बँका मोठी कमाई करतात. त्यातच आता आरबीआयने या आठवड्यात गुरुवारी (10 जून) एटीएममधून पैसे काढणे आणि इतर बँकांच्या एटीएमचा वापर करणे यासाठीच्या शुल्कात वाढ केल्याची घोषणा केलीय. याचा मोठा परिणाम गावांवर होणार आहे. गावांमध्ये मोठ्या अंतरावर एखादं एटीएम असतं. त्याच एटीएमचा वापर सर्व बँकांचे ग्राहक करतात. आता त्यांच्या खात्यातून यासाठी अधिकचे पैसे कापले जाणार आहेत (RBI increases bank inter charges for ATM transaction in India).
सुरुवातीला 2012 मध्ये एटीएम इंटरचार्ज फी म्हणून 15 रुपये आणि इतर बँक सेवांसाठी 5 रुपये आकारण्यात येत होते. आता हे शुल्क वाढून 17 रुपये आणि 6 रुपये करण्यात आलेय. मात्र, बँका आधीच वेगवेगळ्या नावाखाली सर्वसामान्यांकडून पैसे आकारत असताना या कोरोना काळात एटीएम इंटरचार्जेसमध्ये ही वाढ करण्याचं कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.
जेव्हा एका बँकेचा ग्राहक आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापरु करुन पैसे काढतो तेव्हा बँकांना एकमेकांना काही शुल्क द्यावं लागतं. उदाहरणार्थ तुम्ही जर एसबीआय बँकेचे ग्राहक आहात आणि तुम्ही परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून पैसे काढले. तर एसबीआयच्या ग्राहकाने आयसीआयसीआयचं एटीएम वापरल्याबद्दल काही शुल्क द्यावं लागतं त्या शुल्कालाच एटीएम इंटरचार्ज म्हणतात.
खरंतर बँकांकडून ज्या प्रमाणात एटीएम उपलब्ध करुन द्यायला हवेत त्या प्रमाणात एटीएम उभारण्यातच आलेले नाहीत. त्यामुळे बँक ग्राहकांना नाईलाजाने जवळ उपलब्ध असलेल्या इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात. आता आरबीआयने जवळपास 12 वर्षांनंतर शुल्कवाढ केलीय. देशात मार्च 2021 पर्यंत जवळपास 2,15,575 एटीएम आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या 1 लाख लोकांमागे केवळ 20 एटीएम आहेत.
भारतातील गावांमध्ये बँका किती सुविधा पुरवतात हे पाहायचं ठरलं तर केवळ एक आकडेवारीच ते सांगण्यासाठी पुरेशी आहे. ग्रामीण भागात एकूण एटीएमच्या केवळ 20 टक्के एटीएम आहेत. त्यातच आता शुल्कवाढ झाल्यानं याचा भारही ग्रामीण भागातील सर्वसामान्य बँक ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.
देशातील बँका वेगवेगळ्या शुल्कांच्या नावाखाली ग्राहकांचे खिसे कापून मोठी कमाई करतात. आयआयटी बॉम्बेच्या एका अभ्यासानुसार, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने केवळ बीएसबीजी अकाऊंट चार्जेसच्या नावावर 308 कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पीएनबीने देखील कोट्यावधींची कमाई केलीय.
RBI increases bank inter charges for ATM transaction in India