नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : गेल्या दोन महिन्यांपासून महागाईने सर्वसामान्य बेजार झाला आहे. टोमॅटोसह इतर भाजीपाला महाग झाला. डाळीसह मसाल्याचे भाव वाढले. गव्हासह तांदळाने पण सामान्य नागरिकांना वेठीस धरले. ही सर्व संकटं एकदाच कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका बसला. पण आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांना गुडन्यूज दिली आहे. सप्टेंबर महिन्यात खाद्यपदार्थ स्वस्त होतील, महागाईचा तोरा उतरेल, असा दावा आरबीआयने केला आहे. तुमच्या किचनचे बजेट कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. आता टोमॅटो, कांदा वा इतर भाजीपाला रडवणार नाही, असा भाबडा आशावाद बँकेने नागरिकांना दिला आहे. किरकोळ महागाईत (Retail Inflation) घसरण होईल, असा दावा करण्यात येत आहे.
काय केली भविष्यवाणी
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईत घसरणीसंबंधी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरणीला सुरुवात होईल. टोमॅटो आणि इतर भाजीपाल्याचे आकाशाला भिडलेले दर धडाधड घसरतील. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने महागाईत कपात होईल. आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची कपात होणार असल्याने महागाईचा तोरा उतरेल. सप्टेंबर महिन्यात जनतेला मोठा दिलासा मिळेल, अशी आशा त्यांनी दाखवली आहे.
महागाईची पिछेहाट सुरु
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे इंदुरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना हा दावा केला. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, महागाईला लगाम लागेल. केंद्र सरकारने त्यासाठी पावलं टाकली आहेत. केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईची पिछेहाट सुरु होईल, असा दावा त्यांनी केला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महागाई डोक्यावर नाचली. सर्वसामान्य नागरिक महागाईने नागरीक बेजार झाले.
महागाई दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. 30 ते 40 रुपये किलो टोमॅटोचा भाव थेट 300 ते 350 रुपये किलोवर पोहचला. किरकोळ महागाईचा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर 7.44 टक्क्यांवर पोहचला. तरीही भारत जगातील सर्वात वेगाने पुढे धावणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. इतर अनेक अर्थव्यवस्थांना महागाईने जेरीस आणले आहे. त्यामानाने भारताची प्रगती चांगली आहे.
महागाईने गाठला कळस
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महागाईने कळस गाठला. त्यात भाज्यांनी मोठी भुमिका निभावली. किरकोळ महागाई दर 15 टक्क्यांनी वाढला. टोमॅटोनी त्यात सर्वाधिक भर घातली. जुलैमध्ये किरकोळ महागाई दर दर 7.44 टक्के नोंदविण्यात आला. गावात महागाई दर 7.63 टक्के होता तर शहरात किरकोळ महागाई 7.2 टक्के होता. जुलै महिन्यातच भाज्यांची महागाई 37.34 टक्के होती.