नवी दिल्ली : भारत हा कधीही न उलगडणारे कोडे आहे, असे उगाच म्हणत नाही. जगाने, आघाडीच्या अर्थसंस्थांनी व्यक्त केलेले अंदाज मोडीत काढले आहेत. रिझर्व्ह बॅंकेचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना, आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पन्नाचा (GDP) विकास दर 7.8% राहण्याचा अंदाज व्यक्त केला. रेपो रेट (Repo Rate) 4% वर स्थिर ठेवण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला तर रिव्हर्स रेपो रेटही 3.35% राहणार आहे. कोविडविरोधात राबविलेल्या व्यापक लसीकरण मोहिमेमुळे भारत पुन्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असल्याचा दावा दास यांनी केला. लसीकरण मोहिमेमुळे जनजीवन पूर्वपदावर येत असून या काळात उपजीविकेवर परिणाम झाला नसल्याचे दास यांनी सांगितले.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, ‘जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या विविध धोरणात्मक कृती आणि हेतूंमुळे विकसित होत असलेला आर्थिक वातावरण अत्यंत अनिश्चित बनले आहे.वित्तीय बाजारपेठेतील अस्थिरता आणि भूराजकीय तणाव यामुळे एकूणच जागतिक दृष्टिकोनात द्विधा मनःस्थितीचे वातावरण आहे. कोविड -19 च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अत्यंत संसर्गजन्य तिसरी लाट आली असली तरी, व्यापक लसीकरण मोहिमेमुळे ही तिसरी लाट ओसरली.
ते पुढे म्हणाले की, ” मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले तसेच निरंतर आर्थिक स्थिरता आणि आर्थिक मदतीमुळे अर्थ व्यवस्थेने जोरदार पुनरागमन केले आहे. कोरोनारुपी अनेक संकटात अर्थव्यवस्था हेलकावे खात असताना या आव्हानाला अर्थव्यवस्था पुरुन उरले आहेत. संकटांची ही मालिकाच अर्थव्यवस्था मजबूत करत आहेत. जनतेचे आयुष्य वाचवणे ही सरकारची प्राथमिकता होती. त्यानंतर उपजिवीकेचा प्रश्न मार्गी लावणे दुसरी महत्त्वाची गोष्ट होती. कोरोना आणि त्यामुळे अर्थव्यवस्था बाधित झाल्याने दुर्बल घटक आणि गरिबांचे सर्वात मोठे नुकसान झाले. या घटकांना आर्थिक मदत देऊन सक्षम करण्यावर सरकार भर देणार आहे.
IMF ने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकसोबत जाहीर केलेल्या ताज्या अंदाजात म्हटले होते की, भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7.1 टक्के राहील. गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.3 टक्क्यांवर होता. आयएमएफचा ताजा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या 9.2 टक्के आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चालू आर्थिक वर्षातील 9.5 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. आयएमएफचा अंदाज एस अँड पीच्या 9.5 टक्के आणि मूडीजच्या 9.3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र, जागतिक बँकेच्या 8.3 टक्के आणि फिचच्या 8.4 टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण अधिक आहे.
इतर बातम्या