मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज रुपयाच्या मूल्यामध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत (Rupees vs Dollar)28 पैशांची घसरण झाली आहे. पहिल्यांदाच रुपयाचे मूल्य प्रति डॉलर 78 रुपयांवर पोहोचले आहे. रुपया 28 पैशांच्या घसरणीसह प्रति डॉलर 78.11 च्या पातळीपर्यंत घसरला. शुक्रवारी रुपया प्रति डॉलर 77.83 च्या पातळीवर बंद झाला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने याचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला (Economy) बसतो. कुठल्याही देशाच्या चलनाचे मूल्य घसरल्यास संबंधित देशात महागाई वाढते. परदेशातून वस्तुंची आयात करणे अधिक खर्चिक बनल्याने वस्तुंचे दर वाढतात. निर्यातदारांना (Exporter) मात्र ही कमाईची चांगली संधी असते. कारण निर्यातदारांना डॉलरमध्ये पैसे मिळतात. रुपयाची घसरत असलेली किंमत हे सध्या भारतीय अर्थव्यवस्थेपुढील सर्वात मोठे आव्हान बनले आहे.
वाढत असलेले दर आणि आर्थिक विकासात झालेली घसरण यामुळे डॉलरचे मूल्य वाढले आहे. अमेरिकेत देखील महागाईचा भडका उडाला आहे. महागाई गेल्या 41 वर्षांच्या सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. अमेरिकेत महागाई दर वाढून वार्षिक आधारावर 8.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. अमेरिकेत वाढत असलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी या आठवड्यात अमेरिका व्याज दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून चालू आठवड्यात व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. चलनात घसरन झाल्यास पूर्वी एखादे सामान खरेदी करण्यासाठी जेवढे पैसे मोजावे लागत होते, त्यापेक्षा अधिक पैसे द्यावे लागतात. परिणामी महागाईत मोठी वाढ होते. इंधनापासून ते अन्नधान्यापर्यंत सर्वच गोष्टी महाग होतात. वाढत्या महागाईचा जीडीपीला फटका बसतो, जीडीपीची ग्रोथ मंदावते. मात्र चलनात घसरण झाल्यास त्याचा फायदा हा निर्यातदारांना सर्वाधिक होतो. ही त्यांच्यासाठी कमाईची संधी असते. कारण त्यांनी परदेशात निर्यात केलेल्या वस्तुंचा मोबदला त्यांना डॉलरच्या माध्यमातून मिळतो. रुपयाचे मूल्य घसरल्याने आता कच्च्या तेलाची आयात देखील महागणार आहे, त्यामुळे पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
आज भारताला दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे रुपयाचे मूल्य हे आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये देखील मोठी पडझड पहायला मिळत आहे. सेन्सेक्स तब्बल 1200 पेक्षा अधिक अकांनी घसरला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी देखील सेन्सेक्स जवळपास 1100 अकांनी कोसळला होता. आज शेअर मार्केट पुन्हा एकदा 1200 अकांनी कोसळल्याने गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.