मुंबई: जगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स लीक प्रकरणानंतर आता जगातील धनाढ्यांना परदेशात केलेली गुंतवणूक उघड करणारी कागदपत्रे समोर आली आहेत. जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स या शोध मोहिमेत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे नाव असल्याचीही माहिती आहे. सचिन तेंडुलकरसह जगातील अनेक सेलिब्रिटींनी टॅक्स हेवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये विविध माध्यमांतून पैसा गुंतवल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सचिन तेंडुलकरकडून ब्रिटीश व्हर्जिन आयलंड येथील संपत्ती विकण्याचा प्रयत्न झाला होता. पनामा पेपर्स लीक प्रकरणामुळे अनेक भारतीय व्यक्तींनी कर वाचवण्यासाठी परदेशात अवैधरित्या गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर संबंधित भारतीय व्यक्तींना ही संपत्ती विकण्याचे किंवा दुसरीकडे गुंतवणूक करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. यामध्ये सचिन तेंडुलकरचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पँडोरा पेपर्समधील माहितीनुसार, जगातील अनेक राजकारण्यांचीही परदेशात संपत्ती आहे. यामध्ये भारतातील सहा, तर पाकिस्तानमधील सात राजकारण्यांचा समावेश आहे.
या सगळ्या प्रकारानंतर सचिन तेंडुलकरच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केलेली आहे. आयकर विभागाला याविषयी माहिती देण्यात आली होती, असे वकिलांकडून सांगण्यात आले.
NEW: #PandoraPapers reveals the inner workings of a shadow economy that benefits the wealthy and well-connected at the expense of everyone else.
Brought to you by ICIJ and 600+ journalists, the largest collaboration in journalism history. https://t.co/qXMuUcqPc4
— ICIJ (@ICIJorg) October 3, 2021
पँडोरा पेपर्सच्या माहितीनुसार, भारतातील केवळ राजकारणी आणि सेलिब्रिटींनीच परदेशात गुंतवणूक केलेली नाही. तर यामध्ये महसूल खात्याचे माजी अधिकारी, आयकर खात्याचे माजी आयुक्त आणि माजी सैन्याधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर्स प्रकरणामुळे जगभरात अशीच खळबळ उडाली होती. यामध्ये जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना करचुकवेगिरीसाठी परदेशातील बोगस कंपन्यांमध्ये अवैधरित्या गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. यामध्ये अनेक भारतीयांचाही समावेश होता. त्यामुळे या प्रकरणानंतर संबंधित भारतीय व्यक्तींनी आपली गुंतवणूक दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी ब्रिटनमधील न्यायालयाला आपण दिवाळखोर झाल्याचे सांगितले होते. मात्र, पनामा पेपर्सच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 18 परदेशी कंपन्यांची मालकी असल्याची माहिती समोर आली होती.
या अहवालातील माहितीनुसार, 300 हून अधिक भारतीय नावांपैकी 60 जणांविरोधात पुरावे असून त्यांची चौकशीही झाली आहे. येत्या काही याविषयीच्या आणखी काही गोष्टी समोर येतील. या लोकांनी सामोआ, बेलीज, कुक बेटांपासून ते ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामा यासारख्या देशांमध्ये बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा गुंतवल्याचे समजते.