नवी दिल्ली : कोरोनाचा कहर, आखाती देश आणि रशियामधील तणावामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात कोसळल्या आहेत (Petrol price in India). आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत आज 30 टक्क्यांनी घट झाली. ही घट गेल्या 18 वर्षांतील सर्वात मोठी घट मानली जात आहे. भारताला आजच्या घडीला कच्चे तेल हे 1672 रुपये प्रतीबॅरल म्हणजे 10.51 रुपये प्रती लीटरने मिळत आहे (Petrol price in India). त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किंमती 10 ते 12 रुपये प्रती लीटरने स्वस्त करता येऊ शकते, असं SBI ची रिसर्च टीम Ecowrap ने म्हटलं आहे.
कच्च्या तेलाच्या बाजारपेठात सध्या सुरु असलेली मंदी, तसेच सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात वाढलेल्या जागतिक दरयुद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या. याच पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल दरात तब्बल 12 रुपयांनी तर डिझेल दरा 10 रुपयांची कपात करता येऊ शकते, असा दावा SBI च्या रिसर्च टीमने केला आहे.
भारताला कच्चे तेल 1672 रुपये प्रती बॅरलने मिळत आहे. एका बॅरेलमध्ये 159 लिटर कच्चे तेल असतं. या हिशोबाने कच्चे तेल 10.51 रुपयांनी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरस जगभर थैमान घालत असल्यामुळे गेल्या महिन्यात तेलाची मागणी केवळ 51 टक्क्यावर आली. रद्द झालेल्या सहलीच्या पार्श्वभूमीवर एअरलाइन्स आणि क्रूझ जहाजांमध्ये होणाऱ्या इंधनाच्या मागणीला जोरदार फटका बसला आहे. त्यातच उत्पादन कपातीवर सहमती न झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत चढाओढ सुरु आहे.
वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटने (डब्ल्यूटीआय) बुधवारी प्रति बॅरल 23.41 डॉलर दराने तेलाची विक्री केली. 2002-03 मध्ये इतक्या कमी दराने कच्च्या तेलाची विक्री झाली होती. त्यावेळी पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर 30 रुपयांच्या घरात पोहोचले होते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचे दर कमी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातमी : कच्च्या तेलाच्या किमती गडगडल्या, 18 वर्षांतील निच्चांक, पेट्रोल 30 रुपये लिटर द्या, काँग्रेसची मागणी