नवी दिल्ली : जागतिक अर्थकारणातील (International Economic affair) घडामोडींचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात आज (बुधवार) तेजी-घसरणीचं चित्र कायम राहिलं. सेन्सेक्स आज (1 जून) 185.24 अंकांच्या घसरणीसह 55,381.17 आणि निफ्टी 61.80 अंकांच्या घसरणीसह 16,522.75 वर बंद झाला. आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये एमअँडएम, एचडीएफसी, कोटक बँक आणि टाटा स्टील यांचा समावेश झाला. नेस्ले, टेकएम, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा आणि एचसीएल मध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये (Banking Shares) खरेदीचं चित्र राहिल्यामुळं शेअर बाजार सावरला. आजच्या व्यवहारात आयटी आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (Life Insurance Corporation) शेअर 52 आठवड्यांच्या नीच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सर्वाधिक खरेदी एमअँडएम, एचडीएफसी आणि कोटक बँकेत दिसून आली. सर्वाधिक विक्रीचा जोर नेस्ले, टेक एम आणि बजाज फिनसर्व्ह मध्ये राहिला. आज व्यवहार बंद होण्याच्या वेळी निफ्टी वर जेएसडब्ल्यू स्टील, कोल इंडिया आणि एचडीएफसी लाईफ सर्वाधिक वाढीसह बंद झाले. तर बजाज ऑटो, हिंदाल्को आणि टेकएम सर्वाधिक घसरणीसह बंद झाले.
सर्वाधिक बाजार मूल्याच्या (मार्केट कॅपिटायलेझेशन) कंपन्यांच्या क्रमवारीत भारतीय आयुर्विमा महामंडळाची घसरण झाली आहे. एलआयसी इंडियाच्या मार्केट कॅप मधील घसरणीनंतर कंपनी 6 व्या क्रमांकावरुन 7 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. मार्केट कॅपच्या क्रमवारीत आयसीआयसीआय बँक ही एलआयसीला सरस ठरली आहे. एलआयसीला धोबीपछाड देत सर्वाधिक बाजारमूल्य असणारी देशातील 6 व्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे. आयसीआयसीआय बँक आणि एलआयसी इंडिया नंतर एचडीएफसी लिमिटेड 8 व्या आणि भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया 9 व्या स्थानावर आहे. देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या क्रमावारीत रिलायन्स इंडस्ट्रीज अग्रक्रमावर आहे.