शेअर बाजारात गेल्या तीन दिवसात तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 28.65 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या तीन दिवसांमध्ये प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने 4,614.31 अंकांनी वाढून विक्रमी उच्चांक गाठलाय. निवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने मंगळवारी बाजारात सुमारे सहा टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. पण नंतर शेअर बाजारातील मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल बुडाले होते. मात्र, दुसऱ्याच दिवसापासून बाजाराने पुनरागमन केले आणि शुक्रवारपर्यंत त्याची वाढ कायम राहिली.
शेअर बाजारातील लक्षणीय पुनरागमनामुळे, तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल रु. 28,65,742.36 कोटींनी वाढून रु. 4,23,49,447.63 कोटी ($ 5.08 लाख कोटी) झाले आहे.
शुक्रवारी बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,720.8 अंक म्हणजे 2.29 टक्क्यांनी वाढून 76,795.31 वर पोहोचला आहे. नंतर तो 76,693.36 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला, मागील सत्राच्या तुलनेत तो 1,618.85 अंकांनी म्हणजेच 2.16 टक्क्यांनी वाढला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे आपले प्रमुख व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. मजबूत आर्थिक वाढीदरम्यान केंद्रीय बँकेचे लक्ष महागाईवर आहे. यामुळे नव्या मोदी सरकारसाठी सुधारणांना वाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते केंद्रातील आघाडी सरकारमध्ये स्थिरतेच्या आशेमुळे आरबीआयने आर्थिक वर्ष 2024-25 साठी 7.2 टक्क्यांपर्यंत वाढीचा अंदाज सुधारित केल्यानंतर देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी होती.
विप्रो, एलटीआयमिंडट्री, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि अदानी पोर्ट्स सारख्या समभागांनी निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढ केली. तर एसबीआय लाईफ, टाटा कंझ्युमर, एल अँड टी, एचयूएल आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी (4 जून) मोठी घसरणीनंतर सेन्सेक्स गेल्या दोन सत्रांमध्ये 2,995.46 अंकांनी किंवा 4.15 टक्क्यांनी वाढला आहे. सेन्सेक्समध्ये सूचिबद्ध ३० कंपन्यांपैकी विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह आणि टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले. इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, कोटक महिंद्रा बँक आणि आयटीसीच्या समभागांना तोटा सहन करावा लागला.