प्रसिद्ध दिवंगत उद्योपती रतन टाटा यांची सावली म्हणून शांतनु नायडू परिचित आहेत. रतन टाटा यांच्यासोबत ते सावलीसारखे वावरत होते. पण टाटा यांचं निधन झाल्यानंतर अचानक शांतनु यांच्या बातम्या येणं बंद झालं आहे. त्याचं कारणही वेगळं आहे. शांतनु यांनी आता एक नवा उपक्रम सुरू केला आहे. वाचन संस्कृती परत रुजवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. त्यासाठी ते जागृती करत आहेत. देशभर त्याचं जाळं पसरवण्याचं काम ते करत आहेत.
शांतनु नायडू सध्या त्यांच्या बुकीज या प्रकल्पासाठी काम करत आहेत. बुकीज हा एक वाचणाऱ्यांचा ग्रुप आहे. लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गुपचूप वाचन करतात. याची सुरुवात नायडू यांनी सर्वात आधी मुंबईत केली होती. आता मुंबईतच नव्हे तर पुणे आणि बंगळुरूतही हा प्रकल्प राबवला जात आहे.
शांतनु यांनी या आठवड्यात जयपूर बुकीजची सुरुवात केली आहे. तशी घोषणाच त्यांनी केली आहे. यात वाचकांना येत्या रविवारी 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी साइन अप करण्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे. जयपूर… आता वेळ आली आहे. आम्ही तुम्हाला रविवार 8 डिसेंबर रोजी जयपूर बुकीजमध्ये दिसणार आहोत. लॉन्चसाठी तुम्ही साईन अप करा. मी याबाबत खूपच उत्साही आहे, असं शांतनु यांनी म्हटलं आहे. शांतनु यांनी लिंक्डइनवर जयपूरच्या पुस्तक प्रेमींसाठी या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी एक फॉर्मही दिला आहे.
शांतनुला बुकीज हा प्रकल्प मर्यादित ठेवायचा नाहीये. दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आमि सूरत सारख्या शहरात त्यांना हा प्रकल्प न्यायचा आहे. त्यांनी गेल्या महिन्यात बंगळुरूत एक रीडिंग सेशनमध्ये भाग घेतला होता. त्यांनी बुकीज सेशनमध्ये तरुण वाचकांशी संवाद साधला होता. देशात पुस्तके वाचण्याची परंपरा सुरू करण्यासाठी बुकीजचा प्रयत्न आहे. वाचणं हा मानवी अनुभवाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण पूर्वी तास न् तास वाचन करायचो. आता आपण एक एक मिनिटाची रील पाहण्यात बिझी आहोत, असं शांतनु म्हणाले.
रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात शांतनु नायडू यांनाही भागिदार केलं आहे. रतन टाटा आणि शांतनु यांची चांगली मैत्री होती. दोघांमध्येही वयाचं प्रचंड अंतर असलं तरी रतन टाटा हे शांतनु यांना मित्रासारखे वागवत. रतन टाटा यांनी आरएनटी कार्यालयात महाप्रबंधक नायडू यांचे व्हेंचर गुडफेलोसाठी हिस्सेदारी सोडली आहे. एवढंच नव्हे तर रतन टाटा यांनी एज्युकेशन लोनही माफ केलं आहे. गुडफेलोची सुरुवात 2022मध्ये झाली होती. शांतनु यांनी कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएची डिग्री घेतली आहे. शांतनु हे 2017पासून टाटा ट्रस्टमध्ये सहभागी झाले. टाटा समूहात काम करणारी नायडू कुटुंबातील शांतनु हे पाचव्या पिढीतील व्यक्ती आहेत.