गेल्यावर्षी आयपीओ बाजारात (IPO Market) चैतन्याचे वातावरण होते. दिग्गज कंपन्या बाजारात उतरल्या होत्या. त्यातील अनेक कंपन्यांवर गुंतवणूकदारांच्या (Investor) उड्या पडल्या. पेटीएमसारख्या कंपन्यांनी गुंतवणुकदारांचे पार दिवाळे काढले तर काही कंपन्यांनी गुंतवणुकदारांना मालामाल केले. गेल्या वर्षी आठवडाच्या कालावधीत एखादा तरी आयपीओ बाजारात दाखल व्हायचा. मात्र यंदा तीन महिन्यांत आयपीओ बाजारात फार मोठी उलाढाल समोर आली नाही. इतना सन्नाटा क्यू है भाई ? अशी म्हणायची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यांत केवळ 4 कंपन्यांनी बाजारात एंट्री केली आहे. आंतरराष्ट्रीय भूराजकीय (International Geo-Political Conflict) वाद आणि त्यातून बदललेली आर्थिक समीकरणे याचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी बाजारात उतरण्याची त्यांची योजना एकतर रद्द केली आहे किंवा ती पुढे तरी ढकलली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत 16 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात एंट्री घेतली होती. त्यांनी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 15 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली होती. यंदाच्या तिमाहीत केवळ 4 कंपन्यांचे आयपीओ दाखल झाले आहेत. याचा अर्थ आयपीओ मार्केटमध्ये 15 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर बाजारातून रक्कम जमा करण्यात तब्बल 57 टक्क्यांची घसरण झाली आणि 6707 कोटी रुपयेच यामाध्यमातून जमा करण्यात आले आहे. सध्या चेन्नई येथील वेरांडा लर्निंग सोल्यूशन्स यांच्या आयपीओने नुकतीच आयपीओ बाजारात एंट्री घेतली आहे. 29 मार्च रोजी हा आयपीओ बाजारात गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाला.
आयपीओ बाजारात घसरणीची अनेक कारणे आहेत. पण गेल्या वर्षीपेक्षा यंदा आलेली मरगळ गुंतवणुकदारांना विचार करायला लावणारी आहे. बाजारातील तज्ज्ञ या शुकशुकाटामागे अनेक कारणे असल्याचे सांगतात. एका बाजूने व्याजाचे दर वाढत आहेत. तर दुस-या बाजुला कच्च्या तेलाचा भाव आणि महागाई याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटसोबतच शेअर बाजारावर झाला आहे. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्ध संघर्षाची किनार ही आहे. तर चीनमध्ये कोरोनाची नवीन लाट आल्याने कंपन्यांचे उरलेसुरले अवसानही गळाले आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजारावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांचा आयपीओ बाजारात दाखल करण्याची योजना एकतर पुढे ढकलली आहे किंवा स्थगित केली आहे तर काही कंपन्यांनी ती रद्द केली आहे.