मुंबई : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरा(Edible Oil Price)त घट झालीय. जागतिक बाजारातली सध्याची स्थिती पाहता किंमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता उद्योग विश्वा(Industry)तून व्यक्त होतेय. मात्र ही घसरणदेखील मर्यादित असेल आणि सध्या किमतींमध्ये कोणताही मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं नाहीत, असंही मत उद्योग विश्वातून व्यक्त केलं जातंय.
किलोमागे तीन ते चार रुपयांनी भावात घसरण होऊ शकते
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडिया (solvent extraction association-SEA)च्या म्हणण्यानुसार, येत्या काही महिन्यांत खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो 3 ते 4 रुपयांनी घट होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार महिन्याभरात किलोमागं आठ ते दहा रुपयांनी भाव उतरले आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी एका निवेदनात म्हटलंय, की गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत खाद्यतेलाच्या किंमती जागतिक बाजारातल्या चढ्या दरामुळे वाढल्या आहेत, मात्र तेलबियांच्या देशांतर्गत उत्पादनात झालेली वाढ आणि आयात शुल्कात कपात झाल्यामुळे किंमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर सोयाबीन (Soyabean) आणि भूईमुगा(Peanut)ची चांगली उपलब्धता असल्यानं आता खाद्यतेलाचे दर आटोक्यात राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोहरी तेलाचं उत्पादन वाढेल
ते म्हणाले, की मोहरी(Mustard)चे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी मोहरीची पेरणी केली असून पेरणीखालील क्षेत्र 77.62 लाख हेक्टरवर पोहोचलेत, जे गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 30 टक्के अधिक आहे. येत्या हंगामात मोहरीच्या तेलाची उपलब्धता 8 ते 10 लाख टनांनी वाढणार आहे. पुढे ते म्हणाले, की सध्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचा कल असून आगामी काळात केवळ भावात घसरण दिसून येईल. भारत आपली 65 टक्के खाद्यतेलाची गरज आयातीद्वारे भागवतो. देशात खाद्यतेलाचा वार्षिक वापर 22 ते 22.25 दशलक्ष टन इतका आहे. देश यापैकी 13 ते 15 दशलक्ष टन आयात करतो. कोविडमुळे गेल्या दोन विपणन वर्षांमध्ये (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) आयात कमी झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यानं आयात बिल वाढलं. 2019-20मध्ये देशात 71, 600 कोटी रुपयांचं खाद्यतेल आयात करण्यात आलं. तर 2020-21मध्ये तेलाच्या आयातीसाठी 1.17 लाख कोटी रुपये द्यावे लागले.