ग्रामीण भागात कमाईची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमवा पैसे

| Updated on: Jul 10, 2021 | 12:48 PM

सरकारची ही योजना डिजीटल इंडिया अंतर्गत वर्गात येते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिले जाईल.

ग्रामीण भागात कमाईची सुवर्णसंधी; या सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमवा पैसे
सामान्य सेवा केंद्र
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची घडी मोठ्याप्रमाणावर विस्कटली आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गावांमध्ये फैलाव झाल्याने अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची गती कुंठित झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची एक योजना ग्रामीण लोकांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे.  त्यामुळे गावी जाऊन तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. (Start common Service Centre in your village and earn money)

सरकारची ही योजना डिजीटल इंडिया अंतर्गत वर्गात येते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्वत:च्या घरातून किंवा गावातून कामाला सुरुवात करु शकता. ऑनलाईन प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला सामान्य सेवा केंद्र (Common Service Centre) सुरु करता येईल. या माध्यमातून ग्रामीण तरुणांना रोजगारही मिळेल. तसेच डिजीटल इंडिया योजनेचे फायदे गावांपर्यंतही पोहोचतील.

सामान्य सेवा केंद्र उघडण्यासाठी काय करावे लागेल?

सामान्य सेवा केंद्र उघडण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला संगणक चालवण्याचे ज्ञान असायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला register.csc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सामान्य सेवा केंद्र उघडण्यासाठी नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 1400 रुपयांचे शुल्कही भरावे लागेल.
तसेच तुम्हाला सामान्य सेवा केंद्र कुठे उघडणार त्या जागेचा फोटोही संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर एक आयडी जनरेट होईल. त्याआधारे तुम्ही पुढील गोष्टींचा ट्रॅक तपासू शकता. अर्ज स्वीकारल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दिले जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींचा परवाना आपोआप मिळेल.

या केंद्रातून तुम्ही ऑनलाईन कोर्स, सीएससी बाजार, कृषीसेवा, ई-कॉमर्स सेल, रेल्वे तिकीट, विमान आणि बसचे तिकीट आणि मोबाईल व डीटीएच रिचार्जचे काम करु शकता. तसेच तुम्ही पॅनकार्ड आणि पासपोर्ट काढण्याचे कामही करु शकता. या कामांसाठी सरकार तुमच्याकडून पैसे आकारणार नाही.

इतर बातम्या:

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती

स्ट्रॉबेरी शेतीतून मोठ्या कमाईची हमी, शेतकऱ्यांना एक एकरात 8 लाखांच्या उत्पन्नाची संधी

(Start common Service Centre in your village and earn money)