मुंबई : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. त्यामुळे जर तुम्हीही स्विगी वरुन फूड मागवत असाल तर तुमच्याही खिशावर याचा परिणाम होणार आहे. स्विगी कंपनीने प्लॅटफॉर्म फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने फूड डिलिव्हरी ऑर्डरवर प्लॅटफॉर्म फी 2 रुपयांवरून 3 रुपये केली आहे. गेल्या आठवड्यात Swiggy ने Rs 99 चा एक स्वस्त मेंबरशिप प्लान, One Lite मेंबरशिप देखील लाँच केला होता. ही सदस्यता घेतल्यानंतर युजर्सला फ्री डिलिव्हरीसह अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत.
प्लॅटफॉर्म फी फक्त स्विगीच्या फूड डिलिव्हरी सेवेवर लागू असणार आहे. इंस्टामार्ट ऑर्डरवर नाही. एप्रिलमध्ये, कंपनीने कार्ट मूल्याकडे दुर्लक्ष करून प्रति ऑर्डर 2 रुपये प्लॅटफॉर्म फी लागू केली होती.
स्विगीने सांगितले की, “प्लॅटफॉर्म फीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. इंडस्ट्रीमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. “आम्ही ज्या शहरांमध्ये काम करतो त्या बहुतांश शहरांमध्ये सध्या प्लॅटफॉर्म फी 3 रुपये आहे.”
ऑगस्टमध्ये स्विगीचा प्रतिस्पर्धी झोमॅटोनेही प्लॅटफॉर्म शुल्क सुरुवातीच्या 2 रुपयांवरून 3 रुपये प्रति ऑर्डर वाढवला होता. झोमॅटोने झोमॅटो गोल्ड युजर्ससाठी प्लॅटफॉर्म शुल्क आकारण्यास सुरुवात केली, ज्यांना पूर्वी सूट देण्यात आली होती.
Swiggy ने त्याच्या ग्राहकांसाठी 3 महिन्यांसाठी 99 रुपयांत वन लाइट मेंबरशिप सुरू केली आहे. वन लाइट युजर्सला 149 रुपयांपेक्षा जास्त फूड ऑर्डरवर 10 मोफत डिलिव्हरी मिळतील, तसेच 199 रुपयांपेक्षा जास्त इंस्टामार्ट ऑर्डरवर 10 मोफत डिलिव्हरी मिळतील. मोफत डिलिव्हरी व्यतिरिक्त, सदस्यांना 20 हजारांहून अधिक रेस्टॉरंटमध्ये नियमित ऑफरसह 30 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल. कंपनीने सांगितले की, One Lite सदस्यांना 60 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्विगी जिनी डिलिव्हरीवर 10% सूट मिळेल.