मुंबई : कवडीमोल किमतीत खरेदी करण्यात आलेले काही पेनी स्टॉक्स (penny stock) आता दाम दुप्पट परतावा देत आहेत. या स्टॉक्सचा कामगिरीमुळे शेअर बाजारातील तज्ज्ञदेखील अवाक झालेले आहेत. लोक मल्टीबॅगर स्टॉकमधून (multi bagger stock) 100 टक्के, 500 टक्के किंवा 1000 टक्के परताव्याची अपेक्षा करू शकतात, परंतु जर तुम्हाला सांगण्यात आले की एखाद्या स्टॉकने 1 हजार किंवा 10 हजार टक्के नाही तर तब्बल गुंतवणूकदारांना 23 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे… तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु असे खरच झाले आहे. हैदराबादस्थित क्लाउड कॉम्प्युटिंग कंपनी Tanla Platforms Ltd स्टॉकने हा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना (investors) गेल्या 10 वर्षांत 23 हजार टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
कंपनीचा शेअर बुधवारी (4 मे 2022) रोजी BSE वर 0.26 टक्क्यांनी वाढून 1,436.15 रुपयांवर बंद झाला. याच्या अगदी 10 वर्षांपूर्वी म्हणजे 04 मे 2012 रोजी या स्टॉकचे मूल्य 10 रुपयांपेक्षा कमी होते. तेव्हा त्याची किंमत फक्त 6.2 रुपये होती. हा शेअर ज्या प्रकारे वाढला आहे, जर 10 वर्षांपूर्वी एखाद्याने या स्टॉकमध्ये फक्त 500 रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 लाख रुपयांहून जास्त असेल.
कंपनीने नुकतेच मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी वाढून 140.62 कोटी रुपये झाला आहे. मार्च 2021 च्या तिमाहीत कंपनीला 102.54 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या कालावधीत कंपनीची विक्री 31.53 टक्क्यांनी वाढून 853.05 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या 648.56 कोटी रुपये होती. सध्या BSE वर कंपनीचा mcap 19 हजार कोटींहून अधिक आहे.
दरम्यान, या स्टॉकची घोडदौड असून सुरुच आहे. ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजकडून असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सिक्युरिटीजने 1,867 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग कायम ठेवले आहे. याचा अर्थ जर येस सिक्युरिटीजचे मूल्यांकन बरोबर असले तर येत्या काही दिवसांत हा स्टॉक आणखी ३० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. येस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे, की कंपनी भारतातील CPaaS स्पेसमध्ये अग्रेसर आहे आणि उद्योगापेक्षा वेगाने वाढत आहे.