नवी दिल्लीः कोरोनाने वाहन उद्योगांना मोठा फटका बसलाय, त्यानंतर चिप्सच्या कमतरतेमुळे संकट अधिक गडद झालेय. सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे सर्व वाहन कंपन्यांची विक्री कमी झालीय. चिप संकटामुळे JLR विक्रीवर परिणाम झाला, एवढेच नाही तर देशातील अनेक टाटांच्या वाहनांची विक्रीही कमी झाली आहे, असं टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते. पण आता टाटा कंपनी या संकटाचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे.
टाटा समूह सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांट उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकतो. देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी युनिट्स स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी 2250 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते.
टाटा समूह आऊटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट (OSAT) प्लांट स्थापन करण्यासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांशी चर्चा करीत आहे. या राज्यांमध्ये प्लांटसाठी भूसंपादनाची चर्चा सुरू आहे. आम्ही सेमीकंडक्टर व्यवसायात प्रवेश करू शकतो, असंही गेल्या काही महिन्यांपूर्वी टाटा समूहानं सांगितलेय.
टाटा समूह सॉफ्टवेअरच्या बाबतीत खूप मजबूत आहे. पण आता त्याला हार्डवेअरमध्येही आपले स्थान मजबूत करायचेय. पुढील वर्षाच्या अखेरीस समूहाच्या कारखान्यांमध्ये काम सुरू होऊ शकते. यामध्ये 4000 लोकांना रोजगार मिळू शकतो. सेमी कंडक्टरच्या कमतरतेची समस्या जगातील सर्व मोठ्या वाहन कंपन्यांना भेडसावत आहे. भारतात सणासुदीच्या काळात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली होती. गेल्या डिसेंबरपासून जगभरात सेमीकंडक्टरचा तुटवडा सुरू झाला.
चिप एक पोर्ट डिव्हाइस आहे, ती डेटा ठेवण्यासाठी वापरली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास ऑटोमोबाईल उद्योगापासून ते इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांपर्यंत चिप्सचा तुटवडा जाणवत आहे. सेमीकंडक्टर चिप्सचा वापर इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर स्टिअरिंग आणि ब्रेक्स ऑपरेट करण्यासाठी केला जातो. नवीन वाहनांसाठी ही चिप अत्यंत महत्त्वाची आहे. ही एक छोटी चिप आहे, जी कारमध्ये वापरली जाते.
हायटेक वाहनांमध्ये अनेक प्रकारच्या चिप्स वापरल्या जातात. सेफ्टी फीचर्समध्येही चिप वापरली जाते. एका प्रकारे या सेमीकंडक्टर चिपला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे ‘मेंदू’ समजतात. विशेष म्हणजे आता ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहेत. इलेक्ट्रिक वाहने नेहमीच्या वाहनांपेक्षा जास्त चिप्स वापरतात. त्यामुळे चिप पुरवठ्याअभावी इलेक्ट्रिक वाहनांनाही फटका बसू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वात मोठ्या चिप निर्मात्यांसाठी चालू वर्ष खूप तणावपूर्ण असणार आहे. कोरोना संकटामुळे उत्पादन प्रभावित झाले होते, परंतु आता चिप्सची वाढती मागणी कशी पूर्ण करायची हे मोठे आव्हान आहे. चिपचे मोठे उत्पादन तैवानमध्ये केले जाते. या कारणास्तव जगातील बहुतेक कंपन्या तैवानवर अवलंबून आहेत.
संबंधित बातम्या
…हा तर आमच्या खिशावर टाकलेला दरोडा; कोरोनाच्या नव्या नियमांवर व्यापाऱ्यांचा संताप