नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies) बहुप्रतिक्षित आयपीओ या 22 नोव्हेंबर रोजी बाजारात येऊन धडकला. या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. आज या आयपीओत गुंतवणूक करण्याचा अखेरचा दिवस आहे. गुरुवारी या आयपीओसाठी 14.85 पट बोली लागली. जवळपास दोन दशकानंतर टाटा समूहातील एखाद्या कंपनीने बाजारात पाय ठेवला आहे. NSE च्या आकडेवारीनुसार, 3,042.5 कोटी रुपयांच्या आयपीओमध्ये 4,50,29,207 शेअर बाजारात आले. आतापर्यंत 66,87,31,680 शेअरची बोली लागली आहे. त्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीजने दोनच दिवसात बाजारात धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. हा एक रेकॉर्ड आहे. टाटाने झोमॅटो, रिलायन्स पॉवर, नायक आणि इतर अनेक कंपन्यांना धोबीपछाड दिली आहे.
गुंतवणूकदारांच्या पडल्या उड्या
बुधवारी टाटा टेक्नॉलॉजीजचा इश्यू उघडला. काही मिनिटांतच तो विक्री झाल्याचे दिसून आले. हा इश्यू आजपर्यंत गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी 475-500 रुपये प्रति शेअर हे मूल्य निश्चित करण्यात आले आहे. हा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित आहे. यादरम्यान 6.08 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे. इश्यू बाजारात येण्यापूर्वीच कंपनीने एंकर गुंतवणूकदारांकडून 791 कोटी रुपये जमा केले.
एका लॉटमध्ये 30 शेअर
सर्वसामान्य गुंतवूकदारांसाठी एका लॉटमध्ये 30 शेअर असतील. कोणत्या पण गुंतवणूकदाराला कमीत कमी 15 रुपयांचा डाव टाकावा लागेल. तर गुंतवणूकदार जास्तीत जास्त 390 लॉटमध्ये गुंतवणूक करु शकेल. सध्या टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये प्रमोटर्सची एकूण 66.79 टक्के वाटा आहे. आयपीओनंतर ही हिस्सेदारी 55.39 टक्क्यांपर्यंत घसरेल. कंपनी 6.09 कोटी शेअर आणणार आहे.
किती आहे जीएमपी
ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचा अनलिस्टेड शेअर 388 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. इश्यू प्राईसपेक्षा सध्या ही किंमत 77.6 टक्के अधिक आहे. ग्रे मार्केटनुसार, हा शेअर 888 रुपयांवर सूचीबद्ध होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयपीओतील प्रमोटर्स कंपनी टाटा मोटर्स 4.62 कोटी शेअरची विक्री करणार आहे. त्यातील 10 टक्के वाटा पात्र शेअरहोल्डर्ससाठी राखीव आहे. टाटा समूहाचा हा गेल्या 20 वर्षांतील पहिला आयपीओ आहे. यापूर्वी 2004 मध्ये टीसीएसचा आईपीओ बाजारात आला होता.