नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : दमदार जाहिरातीच्या जोरावर मॅगीने (Maggi) बाजारातील त्यांचा शेअर वाढवला आहे. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत मॅगीची क्रेझ आहे. अवघ्या दोन मिनिटात पोटोबा करण्याचा दावा कंपनी करते. किरकोळ विक्रेत्यांकडे हे प्रोडक्ट (Instant Food Product) हातोहात विक्री होत असल्याने हे आवडीचे रेडी टू फूड असल्याचे समोर आले आहे. पण मॅगीच्या बाजारातील या राजेशाहीला लवकरच सुरुंग लागण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात जुन्या समूहाने रेडी टू इट या प्रकाराच्या उद्योगात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाच्या टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने (Tata Consumer Product) त्यासाठी पावलं टाकली आहेत. त्यामुळे मॅगीचा बाजाराती दबदबा धोक्यात आला आहे. टाटा समूह हा ब्रँड विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे.
ही कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न
चिंग्स सीक्रेट आणि स्मिथ अँड जोन्स ब्रँड्स हे कॅपिटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत काम करतात. मसाले आणि फूड प्रोडक्ट्स तयार करण्याचे काम हे दोन युनिट करतात. कॅपिटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड विक्री होणार आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी टाटा समूह मैदानात उतरला आहे. या स्पर्धेत टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सर्वात पुढे आहे. नेस्ले आणि द क्राफ्ट हेंज कंपनी पण या स्पर्धेत दावेदार आहे.
काय आहे योजना
टाटा या कंपनी खरेदी करणाऱ्यात प्रमुख दावेदार मानण्यात येत आहे. कॅपिटल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन प्रमुख गुंतवणूकदारांकडून 65-70 टक्के हिस्सेदारी विकत घेण्याची टाटाची योजना आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 5,500 असू शकते. इनवस ग्रूप, अमेरिकन समूह जनरल अटलांटिक आणि या कंपनीचे संस्थापक अजय गुप्ता हे तीन गुंतवणूकदार आहेत. त्यांच्याकडे क्रमशः 40,35 आणि 25 टक्के वाटा आहे. या करारासाठी कोटक महिंद्रा हा टाटा समूहाचा सल्लागार आहे.
मॅगीला टक्कर
या करारामुळे टाटा कंपनी नेस्लेचे प्रमुख उत्पादन असलेल्या मॅगीला बाजारात टक्कर देईल. नेस्लेच्या मॅगीचे बाजारात 60 टक्के हिस्सेदारी आहे. ही कंपनी 5000 कोटी रुपयांच्या ब्रँडेड इस्टंट नूडल्स बाजारातील हुकमी एक्का आहे. तर टॉप रेमन, वाई वाई आणि पतंजली या स्पर्धेतील भागीदार आहेत.