आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी दणदणीत विजय मिळवला. विधानसभा निवडणूक निकालानंतर त्यांच्या घरात जणू पैशांचा पाऊस पडू लागला आहे. चंद्रबाबू नायडू यांची पत्नी आणि मुलाने मागील पाच दिवसांत बंपर कमाई केली. ही कमाई फक्त एक कंपनीमुळे झाली आहे. या कंपनीने चंद्रबाबू नायडू परिवारास मालामाल केले आहे. या कंपनीतील गुंतवणूकदारांनी खूप पैसा कमवला आहे. केवळ पाच दिवसांत चंद्रबाबू नायडू यांच्या पत्नीने 535 कोटी रुपये कमावले तर मुलानेही 237 कोटी रुपये कमवले आहे.
नायडू यांच्या टीडीपी पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. एनडीएला लोकसभेत बहुमत मिळाले तर आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपी सरकार बनवणार आहे. चंद्रबाबू नायडू 12 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. टीडीपीच्या या यशाचा परिणाम शेअर मार्केटमध्ये त्यांची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांवर झाला आहे.
नायडू यांनी 1992 मध्ये हेरिटेज फूड्स या कंपनीची स्थापना केली होती. त्याचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध आहेत. नायडू यांनी निवडणुकीत केलेल्या कामगिरीनंतर या कंपनीच्या समभागांनी (हेरिटेज फूड्स शेअर) 5 दिवसांत 55 टक्क्यांची उसळी घेतली आहे. नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी या कंपनीतील सर्वोच्च शेअरहोल्डर आहेत. त्यांच्याकडे या कंपनीचे 2,26,11,525 शेअर्स आहेत. पाच दिवसांत शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे त्याच्या संपत्तीत 535 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्याकडेही हेरिटेज फूड्स लिमिटेडचे 1,00,37,453 शेअर्स आहेत. 3 जून रोजी हा शेअर 424 रुपयांवर व्यवहार करत होता, तर शुक्रवारी हेरिटेज फूड्सचा शेअर 661.25 रुपयांवर पोहोचला. या प्रचंड वाढीमुळे त्यांच्या मुलाच्या संपत्तीत 237.8 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. हेरिटेज फूड्समध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या परिवाराचे 35.71% म्हणजेच 3,31,36,005 शेअर आहे. मागील पाच दिवसांत त्यांना प्रत्येक शेअरमागे 237 रुपये फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांना एकूण 785 कोटी रुपये मिळाले आहे.
चंद्रबाबू नायडू यांची पत्नी नारा भुवनेश्वरी तेलुगु चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि तेलुगु देशम पार्टीचे संस्थापक एन.टी. रामाराव यांची मुलगी आहे. त्या राजकारणात सक्रीय आहेत. तसेच हेरिटेज फूड्स कंपनीत सर्वात मोठे शेअरधारक आहेत. चंद्रबाबू नायडू यांच्याशी त्यांची भेट राजकारणाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर सप्टेंबर 1981 मध्ये त्यांनी लग्न केले.